म्हाडा लॉटरीतून मिळालेली महाग सदनिका वास्तुदोष म्हणून केली परत

mhada
मुंबईत चांगल्या महाग इमारतीत म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळूनही ते परत केल्याचा चमत्कार घडला आहे. विशेष म्हणजे हा चमत्कार करणारे शिवसेनेचे अग्रीपाडा शाखेचे प्रमुख आहेत. त्यांचे नाव विनोद शिर्के. त्यांना गतवर्षी म्हाडा लॉटरी मध्ये नाना चौक येथे उभारल्या गेलेल्या धवलगिरी या इमारतीत दोन सदनिका मिळाल्या. त्यातील एक ४ कोटींची तर दुसरी ५ कोटी ८० लाखांची आहे. त्यातील दुसरी त्यांनी म्हाडाला परत दिली आहे.

मुंबई सारख्या ठिकाणी राहण्यासाठी जागा मिळविणे किती अवघड आणि दुष्प्राप्य आहे हे वेगळे सांगायला नको. म्हाडा तर्फे मुंबईत विविध भागात घरे बांधली जातात आणि लॉटरी काढून ती विकली जातात. म्हाडाच्या लॉटरीत नंबर लागणे हे मोठे भाग्याचे समजले जाते. म्हाडा तर्फे काही अलिशान इमारतीही बांधल्या जातात आणि त्यातील सदनिका महाग असतात आणि त्याही लॉटरी काढून विकल्या जातात. शिर्के यांना दोन सदनिकांची लॉटरी लागली पण त्यांच्या बालपणीच्या मित्राने या सदनिकेत वास्तूदोष असल्याचे व शिर्के यांच्या पुढील राजकीय व सामाजिक उत्कर्षाच्या दृष्टीने ते योग्य नसल्याचा सल्ला दिला आणि शिर्के यांनी ही सदनिका परत केली.

म्हाडा अधिकाऱ्यांनी शिर्के यांनी सुमारे ६ कोटी रुपये किमतीची सदनिका परत केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे हि सदनिका म्हाडातर्फे विकल्या जाणाऱ्या सर्वात महाग सदनिकेतील एक आहे. शिर्के यांना लॉटरी लागलेल्या दोन्ही सदनिका २ बेडरूमच्या आहेत.

Leave a Comment