अटीतटीच्या सामन्यांत पंजाबची राजस्थानवर १४ धावांनी मात, गेल ठरला सामनावीर

KXIP
२०१८ च्या सत्रात राजस्थानने पहिल्या चार संघात प्रवेश मिळवला होता तर पंजांबचा संघ चांगल्या सुरुवातीनंतरही पहिल्या चार संघात प्रवेश मिळवु शकला नव्हता. दोन्ही संघ नव्या सत्राची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक होते. स्मिथच्या पुनरागमनानंतरही राजस्थानने रहाणेकडेच कर्णधारपद कायम ठेवले आहे. राजस्थानचा कर्णधार रहाणेनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानचा संघ स्मिथ, स्टोक्स, बटलर व आर्चर तर पंजाबचा संघ गेल, पुरन, सॅम करन व मुजीब उर रहेमान या परदेशी खेळाडुंसोबत खेळत होते.

पहिल्याच षटकांत धवल कुलकर्णीने के एल राहुलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. त्यानंतर गेल व अगरवालने डाव सावरत धावसंख्या ५० च्या पुढे नेली होती पण त्यातच कृष्णप्पा गौतमने अगरवालला बाद करत गेल-अगरवालची ५६ धावांची भागिदारी फोडली तेव्हा पंजांबने ८.५ षटकांत २ गडी गमावत ६० धावा केल्या होत्या. गेल अजुनही मैदानावर तळ ठोकुन होता तर त्याला साथ द्यायला आला तो युवा फलंदाज सरफराज खान. पुढील दोन षटके निट खेळुन काढल्यानंतर गेलने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली त्यात त्याने आपले अर्धशतकही साजरे केले आणि बघता-बघता पंजाबने पुढील ५ षटकांत ७० धावा वसुल केल्या. १६ व्या षटकांत गेल ७९(४७) धावा काढुन बाद झाला पण तोपर्य़ंत त्याने आपल्या संघाने चांगल्या स्थितीत पोहचवले होते. गेल बाद झाल्यानंतरच्या १४ चेंडूत एकही चौकार आला नव्हता पण शेवटी युवा फलंदाज सरफराज खानने जबाबदारी घेत संघाला १८४ धावांपर्यंत पोहचवले. सरफराजने २९ चेंडूत नाबाद ४६ धावांची खेळी केली. राजस्थानकडुन स्टोक्सने सर्वाधिक २ गडी बाद केले.

१८५ धावांच आव्हान तसं मोठं पण या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी राजस्तानला चांगल्या सलामीची आवश्यकता होती. पहिल्याच षटकांत कर्णधार रहाणेनी पहिलाचा आयपीएलचा सामना खेळणाऱ्या सॅम करनच्या गोलंदाजीवर तीन चौकार मारत संघाला शानदार सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर बटलरने पंजाबच्या सर्वच गोलंदाजांवर हल्ला चढवला. बटलर चांगल्या लयीत दिसल्याने रहाणेनी सावध पवित्रा स्विकारला होता. त्यातच ८ व्या षटकांत बटलरने आपले अर्धशतक साजरे केले पण पुढच्याच षटकांत रहाणे अश्विनच्या गोलंदाजीर त्रिफळाचीत झाला.

रहाणे बाद झाल्यानंतर बटलरने सॅमसनसोबत ३० धावांची भागिदारी केली पण १३ व्या षटकांत बटलर ६९ नाट्यमयरीत्या धावबाद झाला पण सामन्यांवर राजस्थानचे वर्चस्व होते. तसेच स्मिथ व सॅमसनने तीसऱ्या गड्यासाठी ४० धावांची भागिदारी केल्याने सामना राजस्थान जिंकेल असे दिसत होते पण सॅम करनने एकाच षटकांत स्मिथ व सॅमसनला बाद करत राजस्तानची कंबर मोडली तेव्हा राजस्थानला विजयासाठी ३ षटकांत ३५ धावांची आवश्यकता होती आणि राजस्थानचे ६ गडी बाकी होते. १८ व्या षटकांत मुजीबने स्टोक्स व त्रिपाठीला बाद करत पंजाबकडे सामना झुकवला होता. आता राजस्थानची मदार कृष्णप्पा गौतमवर होती पण शमी व राजपुतच्या गोलंदाजीपुढे त्याचा ही निभाव लागला नाही आणि राजस्थानला १७० धावांत रोखत पंजाबने १४ धावांनी विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. ४७ चेंडूत ७९ धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या ख्रिस गेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक (Cricket Articles)
www.thedailykatta.com

Leave a Comment