मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना नाव न घेता टोला; सध्या बारामतीचा पोपट खूपच बोलू लागला आहे

devendra-fadanvis
कोल्हापूर – तपोवन मैदानावर आयोजित भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता टोला लगावला आहे. यावेळी महाराष्ट्रात बोल घेवड्यांची कमी नाही, पण त्यातच सध्या बारामतीचा पोपट खूपच बोलू लागला आहे. आमचे कपडे कोणीच काढू शकणार नाही. पण आता तुमच्या अंगावर काही शिल्लकच राहिलेले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री राज ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, सध्या महाराष्ट्रात बोलघेवडे खूप असून सुपारी घेऊन काहीजण बोलू लागले आहेत. स्व:त बोलू न शकणारे आता पोपट नेमू लागले आहेत. त्यातच सध्याच्या घडीला बारामतीचा पोपट खूपच बोलू लागला आहे. आमचे कपडे कोणी उतरू शकत नाही, बारामतीच्या त्या पोपटाने हे लक्षात ठेवावे. पहिले तुमचे विधानसभा निवडणुकीत कपडे उतरवले, मग मनपाच्या निवडणुकीत उतरवले. मुंबईत लंगोट शिल्लक होती, ती उद्धव ठाकरेंनी उतरवली असल्यामुळे सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा घरी गप्प बसा. मोदी सूर्य असल्यामुळे सुर्याकडे थुंकल्याने थुंकी आपल्याच तोंडावर पडते याचे भान ठेवा.

दोन्ही नेत्यांनी यावेळी श्रीफळ वाढवून लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह इतर घटक पक्षांचे नेतेही या सभेला उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ५६ पक्ष देश चालविण्यासाठी लागत नाहीत. देश त्यांच्यावर भरवश्यावर चालत नाही. ५६ इंचाची छाती लागते. आमचा पक्ष शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारा आहे. सत्तेमध्ये भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार येणार आहे. आता केवळ लीड मोजणे बाकी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत अरबी महासागर आणि कोल्हापुरात जनतेचा महासागर आहे. आम्ही एकत्रपणे पुढे जात आहोत.

सत्तेसाठी भाजप-सेनेची युती नसून ही विचारांची युती आहे. आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही. जाती, भाषेच्या पलीकडील हिंदुत्ववाद आहे. केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून चालत नाही. मनात राष्ट्रवाद असावा लागतो. महाआघाडीतील ५६ पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीचा समाचार घेतला. कॅप्टनने सुद्धा माढ्यातून माघार घेतली आहे. ओपनिंग बॅट्समनच म्हणत आहे की, मी बारावा गडी म्हणून काम करतो. माढ्यातून माघार घेणाऱ्या शरद पवारांना टोला हाणण्याची संधी देखील फडणवीसांनी सोडली नाही.

Leave a Comment