ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये भारतीय ‘चड्डी’चा झाला समावेश

chuddies
जगभरातील वेगवेगळ्या शब्दांचा प्रसिद्ध ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये वेळोवेळी समावेश केला जातो. भारतातील एका रोजच्या जीवनातील शब्दाचा समावेश यात आता करण्यात आला आहे. तो शब्द आहे ‘चड्डी’. डिक्शनरीमध्ये या शब्दासोबतच ६५० नव्या शब्दांचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला आहे.

हा शब्द ब्रिटीश शासनाच्या वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये सापडला आहे. पण १९९० मध्ये बीबीसीवर येणाऱ्या भारतीय अभिनेत्री मीरा स्याल आणि संजीव भास्कर यांच्या ब्रिटीश-आशियाई कॉमेडी सीरिज ‘गुडनेस ग्रेशिअस मी’मध्ये हा शब्द सापडला. यात ‘Kiss my a**e’ ऐवजी ‘Kiss My Chuddies’ असे संजीव भास्कर यांनी त्यांच्या डायलॉगमध्ये म्हटले होते.

‘शॉर्ट टाऊजर, शॉर्ट्स या रूपाने हा शब्द डिक्शनरीमध्ये देण्यात आला आहे. भारतात चड्डी हा शब्द अंडरविअरसाठी सर्रास वापरला जातो. याबाबत माहिती देताना ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीचे वरिष्ठ सहायक संपादक जे. डेंट यांनी सांगितले की, कोणताही नवीन शब्द डिक्शनरीमध्ये जोडण्याआधी त्यावर विचार केला जातो. त्या शब्दाचा त्यानंतर डिक्शनरीमध्ये समावेश केला जातो. याआधी ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये २६ जानेवारी २०१८ ला ‘नारी शक्ती’ या शब्दाचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर जयपूर साहित्य संमेलनमध्ये जानेवारी २०१९ मध्ये Oxford Dictionaries 2018 Hindi Word of the Year या शब्दाला निवडले गेले होते.

यासोबतच ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये अनेक भारतीय शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात अच्छा, अन्ना, गुलाबजामून, मिर्च मसाला, गोश्त, कीमा, जुगाड, दादागिरी, बापू, सूर्य, चमचा, अब्बा, नाटक, चुप, फंडा या शब्दांचा समावेश आहे. तसेच लूट, बंगला, अवतार, मंत्र, चटणी, खाट, डकैत, डूंगरी, बाजीगर, गुरू, पंडित, खाकी, जंगल, निर्वाण, पक्का, पजामा, महाराज असेही काही शब्द आहेत.

Leave a Comment