भाजपने चोरले आमचे वेबडिझाइन; स्टार्टअप कंपनीचा आरोप

BJP
नवी दिल्ली – देशातील सध्याचा सत्तारुढ पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे संकेतस्थळ काही दिवसांपूर्वी हॅक झाली होती. त्यानंतर आता तब्बल 15 दिवसांनंतर हे संकेतस्थळ सुरु झाले आहे. पण आता या संकेतस्थळावरुन एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या या नव्या अधिकृत संकेतस्थळाससाठी वापरण्यात आलेले वेब टेम्पलेट हे आपल्या मालकीचे असून ते आमची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वापरण्यात आल्याचा दावा आंध्र प्रदेशमधील एका कंपनीने केला आहे. हा आरोप वेब डिझाइन क्षेत्रात काम करणाऱ्या डब्यू थ्री लेआऊट्स या कंपनीने केला आहे. आमची कोणतीही परवानगी न घेता संकेतस्थळासाठी भाजपने आमचे टेम्पलेट वापरल्याचे या कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये चोरी उघड होऊ नये म्हणून टेम्पलेटची बॅक लिंक हटवल्याचा आरोपही केला आहे.

भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणारा सत्ताधारी पक्ष सौजन्य न देता आमचे टेम्पलेट कसे चोरू शकतो?, या मथळ्याखाली कंपनीने ब्लॉग प्रकाशित केला आहे. आंध्रप्रदेशमधील नेर्रोल येथील आम्ही एक लहान स्टार्टअप कंपनी आहोत. प्रिमियम दर्जाचे एटचीएमएल वेब टेम्पलेट तयार करुन आम्ही ते नवीन वेबसाईट करणाऱ्यांना उपलब्ध करुन देतो. भाजपचे संकेतस्थळ मागील काही दिवसांपासून बंद होते. ते पुन्हा सुरु झाले. त्यांनी त्यातही आमचे टेम्पलेट वापरल्याने आम्हाला खूपच आनंद झाला. कोणीही आमच्या संकेतस्थळावरील टेम्पलेट वापरू शकतो. पण ते वापरल्यानंतर संकेतस्थळाच्या शेवटी एक बॅक लिंक असते ज्यावरुन हे टेम्पलेट कोणी तयार केले आहे हे समजते. आपल्या साईटवरून ही बॅक लिंकच भाजपने काढून टाकली आहे. आमचे काम भाजपच्या आयटी सेलला आवडले आणि त्यांनी आमचे टॅम्पेलट वापरल्यामुळे आम्ही खूप खूष होतो. पण बॅकलिंक काढून टाकत त्यांनी या कामाचे श्रेय आम्हाला दिले नसल्याचे समजल्यानंतर आम्हाला धक्काच बसला. या टेम्पलेटसाठी भाजपने आम्हाला पैसेही दिले नाहीत आणि श्रेयही दिले नसल्याचे कंपनीने या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

ट्विटवरून भाजपला ही गोष्ट कंपनीने लक्षात आणून दिल्यानंतर कोणतीही त्यांनी दखल घेतली नाही असा आरोपही या स्टार्टअप कंपनीने केला आहे. ते ब्लॉगच्या शेवटी म्हणतात, भाजपच्या आयटी सेलने आता संकेतस्थळाचे संपूर्ण कोडींग बदलले आहे. स्वत:ला ज्या राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख नेता चौकीदार म्हणवतो तो पक्ष अशाप्रकारे दुसऱ्याचे काम कोणतेही सौजन्य न देता कसे चोरु शकतो असा प्रश्न आम्हाला पडला आहे. एका छोट्या कंपनीचे कामाची चोरी केल्यानंतर पकडले गेल्यावरही चोरी मान्य करण्याचे सौजन्यही पक्षाने दाखवले नाही, अशी टीका डब्यू थ्री लेआऊट्सने केली आहे.

Leave a Comment