बुमराहची दुखापत भारतीय संघासाठी धोक्याची घंटा

jaspreet-bumraha
मुंबई – भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह गेल्या काही वर्षांमध्ये नावारुपाला आला आहे. कसोटी असो टी-२० असो अथवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर बुमराहने अनेक दिग्गज फलंदाजांची भंबेरी उडवल्यामुळे बुमराह आगामी विश्वचषकात भारताचा हुकमी एक्का आहे. बीसीसीआयने हे लक्षात घेता बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून विश्रांती दिली होती. प्रत्येक खेळाडू विश्वचषकात तंदुरूस्त असायला हवा. अशातच आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बुमराहला दुखापत झाली. भारतीय चाहते बुमराह मैदानावर कोसळताच संभ्रमात पडले. प्रत्येक भारतीयांच्या मनात त्याची दुखापत गंभीर तर नाही ना ? असा प्रश्न आला. पण मुंबई इंडियन्सने बुमराहची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

विश्वचषक स्पर्धेला आयपीएलनंतर लगेच सुरूवात होणार आहे. त्यातच भारतीय संघासाठी बुमराहची दुखापत म्हणजे धोक्याची घंटा आहे. भारतीय गोलंदाजीचा भार बुमराहच्या खांद्यावर आहे. बुमराहची दुखपात गंभीर नसल्याचे मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापकाने सांगितले आहे. पण पुन्हा एकदा दुखापतीची स्थिती पाहिली जाईल. मुंबई इंडियन्सने सामन्यानंतर सांगितले की, जसप्रीत बुमराहच्या डाव्या खांद्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. पण, तो त्यातुन सावरत आहे आणि सोमवारीही त्याच्या तंदुरूस्तीची चाचणी केली जाईल. याबाबत पुढील माहिती लवकरच देण्यात येईल.

Leave a Comment