श्रीकांत बोल्ला याची डोळस कहाणी

shrikant-bolla
अनेकदा जन्माने अंध असलेले किंवा काही कारणाने अंधत्त्व आलेले लोक डोळे गेले म्हणून निराश होऊन रडत बसत नाहीत. उलट डोळस माणसालाही लाज वाटेल अशा प्रकारची कर्तबगारी दाखवून डोळस माणसालाही विचार करायला भाग पाडतात आणि कोणतेही शारीरिक व्यंग हे कर्तबगारीच्या आड येत नसते हे आपल्या आचरणाने दाखवून देतात. श्रीकांत बोल्ला हा मुलगा जन्मला तेव्हा आंधळाच होता. हा जन्मांध मुलगा म्हणजे आपल्या कुटुंबावरचा भार आहे अशीच सर्वांची भावना होती. आता मात्र तो अंधपणावर मात करून अशा एका उंचीवर उभा आहे की त्या उंचीपर्यंत डोळस माणसांची नजरसुध्दा पोहोचत नाही.

२४ वर्षाच्या या युवकाने शिक्षण करून स्वतःची कंपनी काढून त्याला बिनकामाचा ठरवणार्‍यांना अक्षरशः शरमिंदे करून टाकले आहे. श्रीकांत बोल्ला आता ५० कोटी रुपये मालमत्तेच्या हैदराबाद येथील बोलंट इंडस्ट्रीज या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तो जन्मल्याबरोबर अंध आहे असे कळले तेव्हा लोकांनी तो दुर्दैवी असल्याची शेरेबाजी केली. परंतु श्रीकांत बोल्ला मात्र स्वतःला फार सुदैवी समजतो. त्याला काही दिसत नाही परंतु त्याने विघटन होईल अशा पॅकिंग मटेरियलचा कारखाना काढला आहे. त्याचे आईवडील अशिक्षित आहेत आणि गरीबही आहेत. परंतु श्रीकांतला पुढे काही शिक्षण देऊ नये हा लोकांनी दिलेला सल्ला त्यांनी मानला नाही आणि आग्रहाने त्याला शिकवले. त्यामुळे श्रीकांत स्वतःला सुदैवी समजतो.

अनेक डोळस तरुण गरीब असल्याचे कारण सांगून जीवनात प्रगती करत नाहीत. परंतु श्रीकांत अंधही होता आणि गरीबही होता. तरीही त्याने गरिबीशी टक्कर देण्याचे ठरवले. तो शाळेत असताना मागच्या बाकावर बसत असे आणि अंधपणामुळे सगळे त्याला उपेक्षेची वागणूक देत असत. अकरावीत गेल्यावर त्याने विज्ञान विषय घ्यायचे ठरवले. परंतु त्याला अंध असल्यामुळे तशी परवानगी मिळाली नाही. मात्र याच अंधपणाचा लाभ मिळवून त्याने अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेटस् विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि त्याने वेगाने प्रगती केली. तो शिकला. उद्योजक झाला आणि आता त्याच्या हुबळी, निजामाबाद आणि हैदराबाद येथे चार उद्योगाच्या शाखा आहेत. चेन्नईपासून ५५ किलोमीटर अंतरावरील श्री सिटी या ठिकाणी असलेल्या त्याच्या कारखान्यात आता सगळी कामे सौर ऊर्जेवर चालणार आहेत.

श्रीकांत अंध असला तरी त्याच्याकडे उत्तम प्रशासन कौशल्य आहे आणि तो उद्योजक प्रवृत्तीचा आहे. हे पाहून रवी म्हंता या गुंतवणूदाराने त्याच्या योजनांमध्ये पैसा गुंतवण्याचे ठरवले. तिथून श्रीकांत बोल्लाची प्रगती व्हायला लागली. शिक्षण घेतानाच्या काळात त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु तो यशस्वी ठरला. त्याला गरीब विद्यार्थ्याची दुःखे माहीत आहेत. म्हणून त्याने आपल्या हातात पैसा येताच गरीब विद्यार्थ्यांना मदत करायचे ठरवले. आजवर त्याने ३ हजार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली आहे.

Leave a Comment