बाळाला स्तनपान देऊ शकणार जपानी बाबा

breast
नवजात बालकाचे पालनपोषण ही जबाबदारी जन्माला घालणाऱ्या आईवडिलांची असते मात्र हे काम बहुतेक वेळा आईवर पडते असे दिसून येते. आईची सहनशीलता, त्याग या गुणांची त्यात कसोटी लागते. यामुळेच आई असताना बाळ सांभाळणे आणि आईच्या अनुपस्थित बाळ सांभाळणे यात खूप फरक पडतो. आई असताना सोपे वाटणारे हे काम आईच्या अनुपस्थित चांगलेच अवघड ठरते. नवजात बाळाला भूक लागली आणि आई जवळ नसेल तर त्यावरचा एक मस्त उपाय जपानी कंपनी देन्तसू ने शोधला आहे.

या कंपनीने असे एक डिव्हाईस तयार केले आहे ज्यामुळे पुरुष सुद्धा बाळाला स्तनपान देऊ शकतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी हे उपकरण एका अहवालाचा निष्कर्ष लक्षात घेऊन बनविले आहे. या अहवालानुसार पती आणि पत्नी मधील तणाव वाढण्याच्या अनेक कारणांत एक बाळाचे फीडिंग हे कारणही आहे. कारण हे काम फक्त आईलाच करावे लागते. आता मात्र तसे होणार नाही. कंपनीने तयार केलेले डिव्हाईस म्हणजे प्रत्यक्षात फॉर्म्युला मिल्कची छोटी टाकी असून ती अंगावर घालता येते.

या टाकीचा पुढचा भाग स्तनाच्या अग्राप्रमाणे आहे. त्यामुळे बाळाला फीडिंग देताना त्याला कुशीत घेऊन दुध पाजणे शक्य होणार आहे. या टाकीला सिलिकॉनचे निपल आहे. शिवाय आईच्या दुधाप्रमाणे हे दुध शरीर तापमानाला गरम ठेवणे शक्य आहे. या डिव्हाईसला फादर नर्सिंग असिस्टंट असे नाव दिले गेले आहे. यात सेन्सर बसविले गेले आहेत. यामुळे मुलाची भुकेची तसेच झोपण्याची वेळ मॉनीटर करता येते. स्मार्टफोन अॅपवर हे डिव्हाईस चालविता येते. सध्या ते कन्सेप्ट रुपात असले तरी लवकरच कंपनी ते बाजारात आणणार आहे.

Leave a Comment