केवळ स्वाद नव्हे तर गुणांनीही परिपूर्ण उसाचा रस

juice
उन्हाळ्याची काहिली आता चांगलीच जाणवू लागली आहे आणि त्यामुळे साहजिकच लोकांची पाउले आईक्रीम पार्लर, थंड पेये विकणाऱ्या दुकानांकडे वळू लागली आहेत. त्यातच उसाच्या गुऱ्हाळानी म्हणजे रसवंती गृहांनी त्याचे संसार सुरु केले असून थंडगार, स्वादिष्ट आणि आले लिंबू घालून केलेला गारेगार रस पिण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

sugarcane
उसापासून मिळणारा हा नैसर्गिक रस केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंटनी समृद्ध असा हा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहे. आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम व अन्य इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण या रसात पुरेसे असते त्यामुळे डीहायड्रेशन झालेल्याना रस पिणे फार उपयुक्त ठरते. सर्वसामान्य सर्दी आणि अन्य किरकोळ साथीचे आजार रोखण्यास रस पिणे फायद्याचे आहे तसेच ताप उतरविण्यासाठी सुद्धा रस पिण्याचा उपयोग होतो कारण उसाचा रस शरीरात प्रोटीनची पातळी वाढवितो.

rasavanti
उसाच्या रसात कर्बोदके, प्रथिने, शिवाय आयर्न, पोटॅशियम अधिक मात्रेत असते यामुळे एक ग्लास उसाचा रस शरीरातील उर्जेची पातळी वाढवितो आणि शरीराचा थकवा दूर करतो. रक्तातील प्लाझ्मा आणि अन्य तरल पदार्थ वाढवितो. मूत्रपिंडाच्या विकारात म्हणजे किडनी स्टोनमध्ये रस पिणे फायद्याचे आहे. तसेच हा रस दात किडणे आणि स्वास दुर्गंधी रोखणारा आहे. यकृत म्हणजे लिव्हरला बळ देणारा असल्याने कावीळ झाल्यास उसाचा रस द्यावा असे सांगितले जाते.

आयुर्वेदानुसार उसाच्या रसाचे सेवन बद्धकोष्ठता दूर करणारे आहे आणि रसात असलेल्या क्षारांमुळे पित्त, पोटातील जळजळ दूर होते. उसाच्या रसात ए तसेच सर्व प्रकारची बी व्हीटॅमीन्स असतात म्हणूनही उसाचा रस आरोग्यवर्धक ठरतो. फक्त रसवंतीगृहात रस पिताना उघड्यावरच बर्फ घालणे टाळावे तसेच रसवंतीगृहाची, तेथील ग्लास, रस पिळणारे चरक यांची स्वच्छता आहे याची खात्री करून घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment