युवा नितीश राणाच्या ६८ धावांनंतर रसेलचा जोरदार प्रहार, कोलकत्ताचा ६ गड्यांनी विजय

KKR
कोलकत्ता आणि हैद्राबाद संघाची लढाई २०१८ च्या सत्रात क्वालिफायर-२ मध्ये झाली होती त्यात हैद्राबादने बाजी मारत अंतिम सामन्यांत धडक मारली होती. डेविड वॉर्नरच्या पुनरागमणामुळे हैद्राबादची फलंदाजी मजबुत झाली होती पण त्यातच दुखापतीमुळे विल्यमसन या सामन्यांत खेळणार होता त्यामुळे विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारकडे कर्णधारपदाची जिम्मेदारी आली होती. कोलकत्ताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

विल्यमसनच्या अनुपस्थितीत जॉनी बेअरस्टोला आयपीएलमध्ये पदार्पणची संधी मिळाली. एक वर्षांनंतर आयपीएल खेळणार डेविड वॉर्नर आणि आयपीएलचा पहिलाच सामना खेळणारा जॉनी बेअरस्टो सलामीला आले होते. फिरकी तिकडीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकत्ताची मदार पुर्णपणे नारायण, कुलदिप व चावलावर होती. एक वर्षांनंतर आयपीएल खेळणाऱ्या वॉर्नरवर दडपण असेल असे वाटत होते पण वॉर्नरने आपल्या नेहमीच्या लयीत सुरुवात केली तर बेअरस्टो काहीसा अडखळत होता. ६ षटकांत बिनबाद अर्धशतक फलकावर लावल्याने हैद्राबाद मजबुत स्थितीत होता. वॉर्नरने कोलकत्ताच्या मुळावरच हल्ला करत नारायण, कुलदिप व चावला विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यातच वॉर्नरने आयपीएल कारकिर्दीतले ३७ वे अर्धशतक झळकावले. १३ व्या षटकांत चावलाने बेअरस्टोला ३९ त्रिफळाचीत करत संघाला पहिले यश मिळवुन दिले. तेव्हा हैद्राबादने ११८ धावा केल्या होत्या.

वॉर्नर आपल्या शतकाकडे आगेकुच करत होता पण आंद्रे रसेलने वॉर्नरला (८५) उथप्पाकरवी झेलबाद तर पुढील षटकांत युसुफ पठाणला त्रिफळाचीत करत मोठे यश मिळवुन दिले त्यामुळे एकवेळ हैद्राबादचा संघ १९०-२०० पर्यंत पोहचेल असे वाटत होते. पण दोन झटपट गडी गमावल्याने हैद्राबादची रनगती खुंटली होती. शेवटी विजय शंकरने २४ धावांत नाबाद ४० धावांची खेळी करत संघाला १८१ धावांपर्यंत पोहचवले. हैद्राबादकडुन वॉर्नरने सर्वाधिक ८५ धावा केल्या तर कोलकत्ताकडुन आंद्रे रसेलने २, चावलाने १ गडी बाद केला.

१८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी कोलकत्ताने दुखापतग्रस्त सुनिल नारायणच्या जागी नितीश राणाला ख्रिस लीनसोबत सलामीला धाडले. दुसऱ्याच षटकांत कोलकत्ताला लीनच्या रुपाने पहिला धक्का बसला त्यानंतर मात्र राणा व उथप्पाने डाव सावरला. एकीकडे भुवनेश्वर, शकिब व सिद्धार्थ कौलने टिच्चुन गोलंदाजी केली पण संदिप शर्माने २ षटकांत २२ धावा दिल्या होत्या. कोलकत्ताला विजयासाठी १० षटकांत ११२ धावांची आवश्यकता होती त्यामुळे कोण आक्रमक पवित्रा घेतो याकडे सर्वांचे लक्ष होते. उथप्पा व राणाची जोडी अडचणीची वाटत असतानाच कौलने उथप्पाला बाद करत कोलकत्ताची अवस्था २ बाद ८७ केली होती. त्यानंतर संदिपने दिनेश कार्तिकला बाद करत कोलकत्ताच्या अडचणीत वाढ केली होती. त्यातच राणाने आपले अर्धशतक साजरे केले. आवश्यक धावगती १३ च्या आसपास पोहचली होती. काही तांत्रिक कारणांमुळे काही काळ खेळ थांबला होता पण खे सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या चेंडूवर राणा ६८ धावा काढुन बाद झाला.

आता कोलकत्ताला विजय मिळवण्यासाठी आंद्रे रसेलकडुन आक्रमक खेळीची अपेक्षा होती. भुवनेश्वरने टाकलेल्या १७ व्या षटकांत फक्त ६ धावा दिल्या पण त्यानंतरच्या दोन षटकांत रसेल ४० धावा वसुल करत सामना कोलकत्ताच्या बाजूने झुकवला होता.शेवटच्या षटकांत १३ धावांची आश्यकता असताना युवा शुभमन गिलने शाकिबच्या गोलंदाजीवर २ षटकार खेचत दोन चेंडू राखुन संघाला ६ गडी राखुन विजय मिळवुन दिला. कोलकत्ताकडुन राणाने ६८, रसेलने नाबाद ४९ धावा केल्या तर हैद्राबादकडुन राशिद खान, कौल, संदिप शर्मा व शाकिबने प्रत्येकी एक गडी बाद केला.

शंतनु कुलकर्णी

क्रिकेट लेखक

www.thedailykatta.com

Leave a Comment