फिरकी तिकडी बळावर चेन्नईचा बेंगलोरवर ७ गड्यांनी विजय, हरभजन ठरला सामनावीर

IPL
२०१९ च्या लोकसभा निवडणुकां आणि २०१९ च्या विश्वचषक लक्षात घेऊन २०१९ च्या आयपीएल सत्राची सुरुवात आजपासुन चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर सुरु झाली. पहिल्याच सामन्यांत २०१८ चा विजेता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंगचा सामना होता तो म्हणजे पहिले विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असणारा विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. बेंगलोरने चेन्नईविरुद्ध चेन्नईत शेवटचा विजय २००८ मध्ये मिळवला होता तर बेंगलोरने चेन्नईविरुद्ध शेवटचा विजय २०१४ च्या आयपीएल सत्रात मिळवला होता. महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

बेगलोरकडुन कर्णधार कोहलीसोबत पार्थिव पटेल सलामीला आला होता. तर चेन्नईकडुन दिपक चहर व हरभजनने गोलंदाजीची कमान सांभाळली. चहर व हरभजनच्या जोडीने कोहली व पटेलला जखडुन ठेवले होत त्यामुळे ४ थ्या षटकांत मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली हरभजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेला मोईन अलीसुद्धा हरभजनचा बळी ठरला. आता संघाची मदार पार्थिव व डीव्हिलीयर्सवर होती पण आपल्या कोट्यातील शेवटच्या षटकांत डीव्हिलीयर्सला बाद करत संघाला मोठे यश मिळवुन दिले त्याच षटकांत आयपीएलचा पहिला सामना खेळणारा हेटमायर धावबाद झाला.

८ षटकांत ४ बाद ३९ अशी स्थिती झाली असताना बेंगलोरचा संघ किती धावा करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. पण हरभजनने बेंगलोर संघाभोवती आवळलेला फास इम्रान ताहीर व जडेजाने आणखीन घट्ट केला. पार्थिवने एक बाजू लावुन धरली होती पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही आणि फिरकीच्या तिकडीसमोर बेंगलोरचा डाव फक्त ७० धावांत आटोपला. सलामीला आलेला पार्थिव २९ बाद होणारा शेवटचा फलंदाज होता. चेन्नईकडुन हरभजन व ताहिरने प्रत्येकी ३, जडेजाने २ तर ब्राव्होने १ गडी बाद केला.

७१ धावांच आव्हान चेन्नईचा संघ किती षटकांत पार करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. खेळपट्टी फिरकी गोलंदाजी मदतगार होती त्यामुळे कोहलीने चहलच्या हाती चेंडू थोपवला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत चहलने वॉटसनला शून्यावर बाद केले आणि बेंगलोर पहिले यश मिळवुन दिले. बेंगलोरच्या गोलंदाजांनी संधी निर्माण केल्या होत्या पण त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. त्यानंतर रायडु व रैनाने संघाचा डाव पुढे नेला त्यातच सुरेश रैना आयपीएलच्या इतिहासात ५००० धावा काढणारा पहिला खेळाडु ठरला. पण त्यानंतर मोईन अलीच्या गोलंदाजीवर मोठा पटका मारण्याच्या नादात रैना १९ धावा काढुन बाद झाला.

रैना बाद झाल्यानंतरही रायडुने एक बाजू लावुन धरली होती. रैना बाद झाल्यानंतर मैदानात आलेला केदार जाधव व रायडु संघाला विजय मिळवुन देतील असे दिसत असतानाच सिराजने रायडुला २८ धावांवर बाद केले. शेवटी केदार (नाबाद १३) व जडेजा (नाबाद ६) ने चेन्नईला १७.४ षटकांत ७ गड्यांनी विजय मिळवुन देत २०१९ च्या सत्राची विजयाने सुरुवात केली. २० धावांत ३ गडी बाद करणाऱ्या हरभजन सिंगला सामनावीर पुरस्काराने गोरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment