काही गाजलेले बँक दरोडे


दरोडेखोर, चोरांनी सराफी दुकाने, बँका लुटल्याच्या खबरा आपण अनेकदा ऐकतो. नुकताच ब्राझीलमध्ये बँक लुटण्याचा केलेला प्रयत्न तेथील पोलिसांनी हाणून पाडला. या चोरीसाठी चोरट्यांनी ६७० मीटरचे भुयार खोदले होते. दरोडयाच्या हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर तो आत्तापर्यंत पडलेल्या दरोड्यातील सर्वात मोठा दरोडा ठरला असता. आपण या प्रकारच्या गुन्ह्यांचा इतिहास चाळला तर असे दिसते की या प्रकारच्या अतर्क्य घटना अनेकदा घडलेल्या आहेत. अगदी दोन वर्षांपूर्वी लंडनमधील सेफ डिपॉझिट व्हॉल्ट लुटून चोरट्यांनी अब्जावधी रूपयांचा माल लंपास केला आहे. अशाच कांही ऐतिहासिक दरोड्यांविषयी-

सेंट्रल बँक ऑफ इराक- बगदाद मधील या बँकेच्या शाखेवर २००३ साली दरोडा घातला गेला. बँकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी. अमेरिकन लष्कराने इराकवर हल्ला चढविला तेव्हा सत्ताधीश सद्दाम हुसेन याने या बँकेला एक नोट लिहूंन दिली होती त्याप्रमाणे बँकेच्या तिजोरीत असलेली रक्कम त्याचा मुलगा कुणे याला द्यायची होती. ही रक्कम होती ९२० दशलक्ष पौंडांची म्हणजे ६ हजार कोटी रूपये. ही सर्व रक्कम चोरट्यांनी लंपास केली.


दुसरी घटनाही इराकमधीलच आहे. दार ए सलाम बँक बगदाद येथे २००७ साली बँकेतील दोन सुरक्षा रक्षकांनीच ही बँक लुटली. इराकच्या सुरक्षामंत्र्यांनी आरोपींची नांवे जाहीर केली. या दोघांनी १८३१ कोटी रूपयांची रक्कम लुटली. हे दोघेही दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे जाहीर केले गेले.


तिसरी घटना आहे लंडनमधील द नाईटसब्रिज व्हॉल्ट येथली १९८७ सालची. ऐशीच्या दशकात झालेली ही फेमस चोरी क्लेरियो विक्सेई या इटालियन प्ले बॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या चोरट्याने हत्यारबंद दरोडेखोरांसह बँकेवर दरोडा टाकून ७३.२ दशलक्ष पौंड म्हणजे ६३२ कोटी रूपये लुटले. त्याने बँकांवर ५० दरोडे घातले आहेत.


बांको सेंट्रल बँक ब्राझील मध्ये २००५ साली चेारट्यांनी घातलेला दरोडा असाच गाजला. या चोरट्यांनी फोर्ट लेजा शहरात बँकेपासून जवळ एक इमारत विकत घेतली. दरोडेखोरांची पूर्ण गँग येथे तीन महिने राहिली व त्या काळात त्यांनी बँकेच्या तळघरापर्यंत चक्क भुयार खणले.२५६ फूट लांबीच्या या भुयारातून जाऊन त्यांनी मुख्य व्हॉल्टमधील ३.५ टन वजनांच्या नोटा लांबविल्या. या नोटांचे मूल्य होते ४५६ कोटी रूपये.


ब्रिटीश बँक ऑफ मिडलईस्ट या बेरूत लेबानन येथील बँकेत युद्ध सुरू असताना पॅलेस्टीनी लिबरेशन ऑरगनायझेशनच्या लुटारूंनी बँकेची चर्चला लागून अ्सलेली भिंत तोडून लॉकर उघडले व त्यातून ३७.८ दशलक्ष पौंड म्हणजे ३२६ कोटी रूपयांची लूट केली.


नॉर्दन बँक बेलफास्ट येथे २००४ साली घातलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी बँक मॅनेजरच्या घरात घुसून त्याच्या कुटुंबियांना बंदी बनविले. बंदुकीच्या धाकावर त्यांनी मॅनेजराला नेहमीप्रमाणे बँकेत जाण्याचा हुकुम सोडला व बँक लुटली. लुटालूट झाल्यानंतर त्यांनी मॅनेजरच्या कुटुंबाला कांहीही इजा न करता सोडून दिले. या लुटीत २६७ कोटींचा ऐवज लंपास केला गेला.


ब्रिक्स मॅट वेअरहाऊस लंडन येथे १९८३ साली मोठी चोरी झाली. सहा चोरांच्या गँगने रक्षकाच्या मदतीनेच कॅश चोरण्याचा डाव आखला. प्रत्यक्षात त्यांना तेथे ३ टन सोने व हिरे असल्याचे कळल्यावर त्यांनी रेाख रकमेऐवजी हाच माल लंपास केला. त्यावेळी या मालाची किंमत होती २६७ कोटी रूपये. पोलिसांनी हा माल अद्यापी परत मिळविता आलेला नाही.


हॅटन गार्डन सेफ डिपॉझिट कंपनी या लंडनच्या संस्थेत २०१५ मध्ये वृद्ध चोरांच्या गँगने अंडर ग्राऊंड सेफ्टी कुलूप तोडून २१६ कोटींचे जडजवाहीर लंपास केले. या दिवशी ईस्टरची सुटी असल्याने चोरी लगेच उघडकीस आली नाही.

Leave a Comment