अखेर शॉटगन यांचा पत्ता कट

shatrughan-sinha
पाटणा – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील महाआघाडीने जागावाटप केल्यानंतर एनडीएतील घटक पक्षांनी आज लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने महाआघाडीला टक्कर देण्यासाठी आपल्या दिग्गज नेत्यांवर डाव लावलेला दिसतो. या यादीत केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद ते केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांचे नाव आहेत. २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी लोकसभा निवडणुकांना उरलेला आहे. राजकीय हालचालींना त्या पार्श्वभूमीवर उधाण आले आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या महाआघाडीच्या जागा वाटपाचा तिढा काल सुटला. त्यानंतर भाजपसह एनडीए पक्षांनी आपले पत्ते उघड केले आहेत.

एक पत्रकार परिषद घेऊन बिहार भाजप प्रमुख भूपेंद्र यादव यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांना यामध्ये पाटणा साहिब येथून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपमधील बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी यापूर्वी येथून निवडणूक लढवली होती. रविशंकर प्रसादला उमेदवारी दिल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट झाल्याचे आता सरळ संकेत मिळाले आहेत.

त्याचबरोबर एनडीएने दिग्गज नेते रिंगणात उतरवले आहे. त्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांचाही समावेश आहे. पूर्व चंपारण येथून राधामोहन सिंह निवडणूक लढवतील तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे बक्सार येथून निवडणूक लढवतील. याव्यतिरिक्त नवादा येथील आमदार गिरीराज सिंह यांचे मतदार संघ बदलून बेगुसराय येथून उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्यासमोर भाकपचे कन्हैया कुमार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीकडून सध्या उमेदवारी जाहीर झालेली नाही. रामपाल यादव पाटलीपुत्र, आर. के. सिंह यांना आरा, राजिव प्रताप रूडी यांना सरण येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave a Comment