शिवज्योत रॅली दिसताच वेळ न दवडता त्यात सहभागी झाले अमोल कोल्हे

amol-kolhe
पुणे – सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे व्यस्त असून आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असून डॉ. अमोल कोल्हे यांना पुणे-आळंदी मार्गावरून प्रचारासाठी जात असताना काही शिवप्रेमी तरुणांची शिवज्योत रॅली पाहिली. ही रॅली दिसताच अमोल कोल्हे वेळ न दवडता त्यात सहभागी झाले. कोल्हे हे स्वतः च्या हातात शिवज्योत घेऊन अनवाणी पायाने धावले.

डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून लोकप्रियता मिळवली असून त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीने उमेदवारी देखील दिली आहे. अमोल कोल्हे यांना शनिवारी प्रचारासाठी जाताना शिवज्योत रॅली दिसली आणि या रॅलीत ते देखील सहभागी झाले. अमोल कोल्हे सहभागी होताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या.

शिवज्योत रॅलीत सहभागी झाल्यानंतर डॉ.अमोल कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सकाळी पुणे- आळंदी मार्गावरून जात असताना शिवप्रेमी तरुणांनी काढलेली शिवज्योत रॅली दिसली आणि माझे पाय आपोआप रॅलीकडे वळाले. मीही थोड्या अंतरासाठी रॅलीमध्ये सहभागी झालो, महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत काही पावले धावल्याचे समाधान मिळाले. आपल्यावर महाराजांचे असणारे ऋण तर कधी फिटणारे नाही. महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला शिकवलेला अभिमान आणि स्वबळावरचा विश्वास यावर आधुनिक महाराष्ट्र आजही उभा आहे. ज्यांचे विचार, कर्तृत्व आणि मुल्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या वतीने मी पोहोचवायचा प्रयत्न करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन करतो, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment