नाव आणि नंबरवाल्या जर्सीसह कसोटी खेळणार टीम इंडिया

jercey
क्रिकेट कसोटी सामने खेळताना पांढऱ्या शर्टवर आता खेळाडूचे नाव आणि नंबर वापरण्यास आयसीसी ने परवानगी दिल्यामुळे टीम इंडिया हा नवा अनुभव विश्व चँपियनशिप कसोटी सामन्यात घेऊ शकणार आहे. हे सामने १ ऑगस्टपासून सुरु होत आहेत. या मालिकेत दुसरा कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात होणार आहे. आयसीसीचे अधिकारी क्लेअर फॉग यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे.

अर्थात टीम इंडिया कसोटीसाठी नाव व नंबर असलेली जर्सी वापरणार असल्याने पांढऱ्या शर्टवर विराटचा १८ नंबर दिसेल पण टीम इंडिया १० नंबर व कदाचित ७ नंबर या यादीतून वगळेल असे समजते. १० नंबर हा मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या जर्सीचा नंबर असून तो नंबर रिटायर केला गेला आहे. म्हणजे हा नंबर आता कुठलाच क्रिकेट खेळाडू वापरू शकणार नाही. त्याचबरोबर ७ हा नंबर कॅप्टन कुल माहीचा आहे. माहीने क्रिकेट कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे आणि त्याच्या सन्मानासाठी ७ नंबरही रिटायर केला जाईल असे सांगितले जात आहे.

युवा खेळाडूना कसोटी क्रिकेटचे आकर्षण वाटावे आणि कसोटी क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार हेण्यास हातभार लागावा म्हणून नाव आणि नंबर असलेल्या जर्सी वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय आयसीसीने गेल्या आठवड्यात घेतल्याचे फॉग यांनी सांगितले. इंग्लिश काउंटी आणि ऑस्ट्रेलिया राज्य टीम शेफिल्ड टूर्नामेंट मध्ये नाव आणि नंबर असलेल्या जर्सी वापरत आहेत.

Leave a Comment