जपानी वृद्ध तुरुंगात जायला मिळावे म्हणून करताहेत गुन्हे

japan
जपान हा देश नेहमीच कोड्यात टाकणारा देश ठरला आहे. जपानी लोकांची शिस्त, प्रामाणिकपणा, अति काम करण्याची वृत्ती, अविवाहित राहण्यास प्राधान्य देणारी तरुणाई, जपान मधील वाढती वृद्ध संख्या, तेथील मेट्रो सेवा, अति हळुवार कलाकुसर केलेल्या शेकडो वस्तू, त्यांचे निसर्गप्रेम, सुंदर बगीचे, टुमदार शहरे, भूकंपाची सततची टांगती तलवार आणि तरीही आनंदी नागरिक अशी जपानची अनेक वैशिष्टे पर्यटकांना भुरळ घालतात.

मात्र आजकाल या जपानमध्ये वृद्ध निवृत्त नागरिक निराळ्याच कारणाने चर्चेत आले असून हे लोक तुरुंगात जायला मिळावे म्हणून जाणून बुजून गुन्हे करू लागले आहेत आणि वर्षागणिक हे प्रमाण वाढत चालले आहे. रोज कुणी ना कुणी ज्येष्ठ काहीतरी गुन्हा करून तुरुंगात जाऊ पाहत आहे.

jails
या मागे अपुरे निवृतीवेतन, एकाकीपणा अशी कारणे असल्याचे सांगितले जात आहे. तुरुंगात खाणे पिणे, मेडिकल सुविधा मोफत पुरविल्या जातात. तसेच वृद्धाना तुरुंगात पूर्ण स्वातंत्र मिळते शिवाय जीवन आरामदायी असते. जेल रक्षक ज्येष्ठ व्यक्तींचे डायपर बदलण्यापासून आवश्यक ती सर्व काळजी घेतात. त्यामुळे गरीब, एकाकी पेन्शनर छोटे मोठे गुन्हे करून तुरुंगात येतात. तुरुंगात असले तरी त्यांचे निवृतीवेतन सुरु राहते. त्यामुळे दोनचार महिने तुरुंगात काढले तर त्यांचे पैसे वाचतात असेही समजते.

१९९७ मध्ये जपान मध्ये दर २० गुन्हेगारामध्ये ६५ वर्षाच्या वरील गुन्हेगार १ असे प्रमाण होते मात्र दोन वर्षापूर्वी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार हे प्रमाण आता दर ५ गुन्हेगारामध्ये एक ज्येष्ठ नागरिक गुन्हेगार असे झाले आहे. जपानची एकूण लोकसंख्या १२.६८ कोटी आहे आणि त्यात ६५ वर्षाचा वरील नागरिकांची संख्या ३.५ कोटी आहे. दोन वर्षापूर्वी २५०० ज्येष्ठ व्यक्ती गुन्हेगार म्हणून तुरुंगात आल्या होत्या.

Leave a Comment