कुली नंबर 1च्या रिमेकमध्ये झळकणार सारा अली खान !

sara-ali-khan
‘कलंक’ आणि ‘स्ट्रिट डान्सर’ या दोन चित्रपटांच्या चित्रिकरणात अभिनेता वरुण धवन सध्या व्यस्त आहे. वरूण या दोन चित्रपटानंतर एक धमाकेदार चित्रपट घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1995 मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली नंबर 1’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा रिमेक असून हा रिमेक वरूणचे वडील डेव्हिड धवन हे दिग्दर्शित करणार आहेत. ‘कुली नंबर 1’मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर लीड रोलमध्ये होते. त्यांच्याशिवाय कादर खान, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर या दिग्गज अभिनेत्यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या रिमेकमध्ये आता सारा अली खानची एन्ट्री झाली आहे.

यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये साराची वर्णी लागली असून या वृत्ताला संवाद लेखक फरहाद सामजी यांनी दुजोरा दिला आहे. कुठल्याही लेखकासाठी वरूणसारख्या अभिनेत्यासोबत काम करणे अभिमानाची गोष्ट आहे. नुकतेच मी त्याला संवाद ऐकवले आणि त्याने लगेच रिहर्सलसाठी या संवादाची एक कॉपी मागवून घेतली. ‘कुली नंबर 1’च्या रिमेकला सुरु व्हायला वेळ आहे. पण त्यासाठी वरूण आताच रिहर्सल करू इच्छितो. सारासोबत मी दुसऱ्यांदा काम करण्यासही उत्सूक असल्याचे फरहाद यांनी सांगितले.

यापूर्वी रोहित शेट्टीच्या‘सिम्बा’साठी फरहाद यांनी संवाद लिहिले होते. सारा अली खान व रणवीर सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. सारा सध्या इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’मध्ये व्यस्त आहे. ‘कुली नंबर 1’च्या रिमेकपूर्वी डेव्हिड धवन यांनी 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’चा रिमेक बनवला होता. यात वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस व तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होते.