भाजपचे 184 पैकी 35 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

BJP
मुंबई – काल रात्री भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यातील 35 जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील खासदार हंसराज अहिर यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्यावर तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत. तर एकूण पाच गुन्हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात दाखल आहेत. ही माहिती उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करणाऱ्या ‘मायनेता डॉट इन्फो’च्या हवाल्याने समोर आली आहे.

यासंदर्भातील वृत्त न्यूज 18ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार २०१४ मध्येही भाजपच्या पहिल्या यादीमधील ७८ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये याच ७८ जणांपैकी ३५ जणांनी गुन्ह्यांसंदर्भातील माहिती दिली होती. पण कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या १०६ उमेदवारांनी याआधी सादर केलेले नसल्याने त्यांच्यावरील गुन्ह्यांसंदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे न्यूज १८ ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पहिल्या यादीतील उमेदवारांची आकडेवारी या १०६ उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यावर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर ‘मायनेता डॉट इन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असणारा भाजपचा उमेदवार आहे. २०१४ साली चंद्रपूर मतदार संघातून निवडणूक लढणाऱ्या हंसराज गंगाराम अहिर यांच्याविरोधात ११ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी २०१४ साली उमेदवारी दाखल करताना आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती दिली आहे. अहिर हे सध्या चंद्रपूरचे खासदार असून केंद्रात ते गृहराज्यमंत्री आहेत. आहिर यांच्याखालोखाल ओडिसामधील प्रताप सारंगी यांचा क्रमांक लागतो. सारंगी यांच्या नावावर १० गुन्ह्यांची नोंद आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश आहे. गडकरी यांच्याविरोधात पाच गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी २०१४ साली दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये हे नमूद करण्यात आले होते. भाजपचे खासदार साक्षी महाराज यांच्याविरोधातही आठ गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये १८ महिला उमेदवारांचा समावेश असून पुढील काही दिवसांमध्ये भाजप आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार आहे.

Leave a Comment