मायावतींची माघार – पराभवाची चाहूल की हत्तीची चाल?

mayawati
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी अचानक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हा धक्का विरतो न विरतो तोच त्यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगून आणखी एक धक्का दिला. त्यामुळे उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वाला आव्हान देऊ पाहणाऱ्या ‘धर्मनिरपेक्ष’ पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण उद्भवले नसते तरच नवल होते. मोठा गाजावाजा करून झालेल्या समाजवादी पक्ष आणि बसपच्या युतीतील अनिश्चितताही त्यातून समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे न राहण्याचा मायावती यांचा निर्णय गोंधळात टाकणारा आहे. खासकरून त्यांच्या मित्रपक्षांच्या दृष्टीने. विरोधकांच्या दृष्टीने तर हा निर्णय आंधळा मागतो एक डोळा अन् देवदेतो दोन असाच आहे. आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार मोहिमेत मुक्तपणे भाग घेता यावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचा त्यांचा दावा पटणारा नाही. त्यावर त्यांनी असेही वक्तव्य केले, की निवडणुकांनंतर आणि गैर-भाजप सरकारचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड झाली, तर बसपच्या एखाद्या खासदाराला राजीनामा द्यायला लावून पोटनिवडणुकीतही त्या निवडून येऊ शकतात.

बसपचे निवडणूक चिन्ह हत्ती आहे. बुद्धिबळातील हत्तीप्रमाणेच मायावती यांच्या बसपचीही उभी-आडवी अशी धडक चाल असते. म्हणूनच आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहोत, हा दावा त्यांनी खुल्लेआम केला. या दाव्यात कितपत तथ्य असो ते असो, मात्र उत्तर प्रदेशच्या राजकीय निरीक्षकांचे मत वेगळेच आहे. खरे कारण म्हणजे निवडणुकीत उभे राहण्याचीच त्यांना भीती वाटत आहे. दलितेतर जातींमध्ये त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर अविश्वास आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्यावर फजित होण्याची वेळ येऊ शकते, हे भय त्यांना सतावत आहे.

मायावती यांनी समाजवादी पक्षाशी युती केली आहे. दलित मतदार हे त्यांचे कट्टर समर्थक. बसपशी युती करणाऱ्या पक्षाला बसपच्या कट्टर मतदारांची मते मिळतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र समाजवादी पक्षाचा मुख्य आधार असलेल्या यादव मतदारांचा इतिहास तसा नाही. त्यांच्या मनात मायावती यांच्याबद्दल मोठी अढी आहे. अशात भाजपनेही यादव उमेदवार दिल्यास ती निवडणूक अटीतटीची ठरली असती आणि मायावतींच्या प्रतिष्ठेला ते मारक ठरले असते.

मायावती यांनी आतापर्यंत चार वेळेस लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. पहिल्यांदा त्या 1989 मध्ये बिजनौर येथून जिंकल्या आणि त्यानंतर 1998, 1999 आणि 2004 मध्ये अकबरपूर येथून. त्यांनी तीनदा राज्यसभेची खासदारकी मिळवली आहे – 1994, 2004 आणि 2012. परंतु तिन्ही वेळेस त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. मात्र 1991मध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावरून मायावती निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या आणि ती जागा भाजपला मिळाली होती.

याही निवडणुकीत त्या पराभवाची पुनरावृत्ती होण्याची भीती त्यांना सतावत आहे. गेल्या वेळेस म्हणजे 2014 मध्ये बसपच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे 16व्या लोकसभेत पक्षाचा एकही खासदार नव्हता. यंदाच्या निवडणुकीत सप-बसपच्या युतीत नंतर राष्ट्रीय लोकदलही सहभागी झाला आहे. हे तीन पक्ष उत्तर प्रदेशातील 80 पैकी 78 जागा लढवत आहेत. त्यांपैकी बसप 38 जागी लढत आहे तर रायबरेली आणि अमेठी या दोन जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडल्या आहेत. यातील अधिकात अधिक जागा मिळविण्याचा मायावतींचा प्रयत्न असेल. यदाकदाचित केंद्रात आघाडीचे सरकार आले तर किंगमेकरची भूमिका आपल्याकडे असावी, हा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र तसे झाले नाही तर त्यांचा डाव उलटण्याचीही शक्यता आहे.

याच्या पूर्वी काही दिवस आधीच त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी पंतप्रधान होतील, हा काँग्रेसचा हट्ट आहे आणि त्यासाठी उत्तर प्रदेश हे राज्य महत्त्वाचे आहे. म्हणूनच खुद्द प्रियंका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि बसपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. म्हणूनच मायावतींचा प्रतिस्पर्धी असलेल्या भीमा आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याला प्रियंका रुग्णालयात जाऊन भेटल्या.

थोडक्यात म्हणजे सप, बसप, काँग्रेस इत्यादी गैर-भाजप पक्षांची आघाडी भाजपला तुल्यबळ लढत देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वेळेस उत्तर प्रदेशात भाजपचा जो प्रचंड विजय झाला तो यंदा अशक्य होईल, असे वातावरण काही दिवसांपूर्वी होते. मात्र मायावतींच्या या पवित्र्याने त्या अपेक्षेला तडा गेला आहे.

Leave a Comment