साताऱ्यात पहायला मिळणार हायव्होलटेज लढत

combo1
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षात आयात-निर्यात सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असून उदयनराजे यांच्या विरोधात साताऱ्यातून शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उमेदवारी दिली जाणार आहे. नरेंद्र पाटील कोल्हापुरात आयोजित युतीच्या मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आधी भाजपकडून सातारा मतदारसंघातून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव समोर आले होते. भाजपकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. पण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय नरेंद्र पाटील यांनी घेतला आहे.

माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे नरेंद्र पाटील पुत्र आहेत. नरेंद्र पाटील यांची सातारा, वाई, कोरेगाव, पाटण येथील माथाडी मतदारांवर पकड आहे. मराठा मोर्चे निघाले होते, त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे ही मते नरेंद्र पाटील यांना मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटील रिंगणात उतरणार आहेत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमंडळाचे राज्य सरकारने अध्यक्षपद दिल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सातारा मतदारसंघ हा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत ही जागा भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता रामदास आठवले काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment