फेसबुकचे कर्मचारी पाहू शकत होते कोट्यावधी युझर्सचे पासवर्ड

facebook
सोशल मीडियाच्या जगात फेसबुक हे नाव अग्रस्थानी आहे. त्यातच फेसबुक दरवेळी आपल्या युझर्सला नवनवीन फिचर देऊन आश्चर्यचा धक्का देत असते. पण यावेळी फेसबुकने अशी कबुली दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला जोरदार धक्का बसणार एवढे मात्र नक्की आहे. कारण फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोट्यावधी युजर्सचे पासवर्ड हे पहाता येत होते अशी धक्कादायक कबुली फेसबुकने दिली आहे. हे पासवर्ड फेसबुक कंपनीबाहेर कुणालाही समजलेले नाहीत. तसेच फेसबुकतर्फे याचा दुरुपयोग करण्यात आलेला नाही असे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.

हा धक्कादायक प्रकार सायबर सुरक्षा तपासणीच्या वेळी समोर आला आहे. युझरसोबत फेसबुकने केलेल्या सुरक्षा करारांचा हा भंग असल्याचा आरोपही होत आहे. याबद्दलची माहिती एका ब्लॉग पोस्टद्वारे इंजिनिअरींग, सिक्युरिटी अँड प्रायव्हसी व्ही पी पेड्रो कनाहोती यांनी दिली आहे. दरम्यान हा सगळा प्रकार जानेवारी महिन्यात उघडकीस आला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती फेसबुकचे सॉफ्टवेअर इंजिनिअर स्कूट रेन्फ्रो यांनीही दिली आहे. तसेच फेसबुकने एकाही पासवर्डचा दुरुपयोग करण्यात आलेला नाही असेही स्पष्ट केले आहे.

Leave a Comment