माजी पंतप्रधानांच्या मारेकऱ्यांना माफी – देशद्रोह यापेक्षा वेगळा काय असतो?

DMK
गेल्या काही वर्षांत आपल्याकडे देशद्रोहाचा आरोप ही किरकोळ बाब झाली आहे. उठसूठ कुठल्याही गोष्टीसाटी देशद्रोहाचा आरोप करणे ही फॅशन झाली आहे. मात्र जेव्हा निवडणुकीच्या नावाखाली मतदारांना भुलविण्यासाठी राजकीय पक्ष तद्दन देशविरोधी आश्वासने देतात, तेव्हा मात्र देशद्रोहाचे हे सूक्ष्मदर्शक यंत्र निकामी होते. काहीसा असाच प्रकार तमिळनाडूत घडला आहे.

निवडणुकीची आश्वासने विसरण्यासाठीच असतात, असे गंमतीने म्हटले जाते. त्यामुळे बेफाट आश्वासने देणाऱ्यांचे फावते. मात्र तमिळनाडूतील राजकारण्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या असून त्यांनी चक्क राष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. गंमत म्हणजे हा प्रकार राज्यातील सत्ताधारी अण्णा द्रमुक आणि विरोधी द्रमुक अशा दोन्ही पक्षांनी केला आहे.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हे निवडणूक प्रचारासाठी गेले असताना मे 1991 मध्ये तमिळनाडूत त्यांची हत्या झाली. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इळम या दहशतवादी संघटनेने त्यांच्या हत्येचा कट रचला. त्यात अनेक तमिळ नागरिकांचा सहभाग होता. त्यांच्यावर यथावकाश खटला चालून त्यांना शिक्षाही झाली. सध्या हे सात गुन्हेगार तुरुंगात आहेत.

तर झाले असे, की अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांनी या गुन्हेगारांना मुक्त करण्याचे आश्वासन आपापल्या जाहीरनाम्यात दिले आहे. हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे? ही कसली नैतिकता? या सात जणांनी राजीव गांधीसारख्या उमद्या पंतप्रधानांची निर्घृण हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे. देशाच्या न्यायप्रणालीत त्यावर पुरेशी सुनावणी झाली आहे आणि पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा खटला गेला होता. त्यानंतरच त्यांना शिक्षा झाली. मग आता मोकळे सोडण्याचे प्रयोजनच काय?

यातली आणखी गंभीर बाब म्हणजे या दोन्ही पक्षांच्या आश्वासनावर भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस यांनी चकार शब्दही काढलेला नाही. सत्ताधारी अण्णा द्रमुकशी भाजपची तर द्रमुकशी काँग्रेसशी युती आहे. अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे बोलूनचालून प्रादेशिक पक्ष. तमिळनाडूबाहेर काय होते, याच्याशी त्यांना फारसे देणे घेणे नाही. मात्र भाजप व काँग्रेस हे स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवतात. मात्र त्यांनी आपल्या या सहकाऱ्यांना रोखण्याचा नावापुरताही विरोध केलेला दिसत नाही.

यापूर्वी या गुन्हेगारांना सोडण्याची मागणी द्रमुकने अनेकदा केली आहे. त्यासाठी विधानसभेत आणि राज्यपालांसमोर भाषणे झाली आहे. मात्र अण्णा द्रमुकने कधी त्यात भूमिका निभावली नव्हती. जयललितांच्या अनुपस्थितीत मात्र पक्षाला अशी उथळ भूमिका घेण्याची गरज भासत आहे.

अण्णा द्रमुकच्या साथीने भाजपला तमिळनाडूत आपली उपस्थिती नोंदवायची आहे. हिंदी भाषकांचा पक्ष म्हणून राज्यातील लोकांमध्ये त्याच्याबद्दल नाराजी आहे. म्हणून तो अण्णा द्रमुकला आवरत नाही म्हणावे, तर काँग्रेस गप्प का आहे? राजीव गांधी काँग्रेस पक्षाचेच प्रमुख होते ना? सध्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे ते पिताजी. राहुल हे गेल्या वर्षी सिंगापूरला गेले असताना आयआयएमच्या माजी विद्यार्थांशी त्यांचा संवाद झाला. “तुम्ही तुमच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केले आहे का,” असा प्रश्न त्यावेळी एकाने विचारला होता. त्यावर राहुल म्हणाले, “आम्ही अत्यंत नाराज होतो आणि दुखावलो होते. अनेक वर्षे आम्ही संतप्त होतो. परंतु हळूहळू…पूर्णपणे, खरे तर पूर्णपणे (आम्ही माफ केले),” असे ते म्हणाले. आता माफ करणे म्हणजे मोकळे सोडणे नव्हे, हे त्यांना कोणीतरी सांगायला हवे. मात्र मतांच्या या रणसंग्रामात नात्यांची माया पातळ झाली तर त्यात काही आश्चर्य नाही.

गंमत अशी, की ज्या श्रीलंकेतील तमिळ ईळमसाठी या दहशतवाद्यांनी राजीवजींचा जीव घेतला, तेथील दहशतवाद संपुष्टात आला आहे. या गुन्हेगारांना सोडावे, अशी मागणी तर श्रीलंकेतील तमिळही करत नाहीत. मात्र आपल्या राजकारणी त्यासाठी धडपड करत आहेत. केवढी ही शोकांतिका? त्यातही तमिळनाडूतील जनताही या मागणीच्या बाजूने उभी आहे, तिच्या भावना तीव्र आहेत असेही नाही.

निवडणुकीच्या या मोसमात आश्वासनांचे पीक जंगली गवताप्रमाणे फोफावत आहे. त्यासाठी आपण कुठल्या थराला जात आहोत, याचे या पक्षांचे भानही सुटले आहे. तमिळनाडूतील हे आश्वासन म्हणजे त्याचाच मासला आहे. कोणत्याही व्यक्तीची हत्या हा जघन्य गुन्हा होय. त्यातही देशाचा पंतप्रधान हा त्या देशाची अस्मिता असतो. माजी असले तरी राजीव गांधी हे पंतप्रधान होते. त्यांच्या अकाली मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांबद्दल राजकारण्यांना उमाळे येत आहेत, ही त्यांच्या हत्येएवढीच भयानक गोष्ट आहे. तिचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. देशद्रोह यापेक्षा वेगळा काय असतो?

Leave a Comment