टीम इंडिया कोच पदावर पुन्हा एकदा रवी शास्त्री?

shastri
टीम इंडियाचे कोच म्हणून जुलै २०१७ मध्ये नेमणूक झालेले रवी शास्त्री यांचीच निवड पुन्हा एकदा या पदासाठी केली जाऊ शकते असे संकेत मिळत आहेत. रवी शास्त्री याची कोच पदाची मुदत इंग्लंड मधील वर्ल्ड कप समाप्तीनंतर म्हणजे १४ जुलै २०१९ ला संपत आहे आणि त्यानंतर लगेच बीसीसीआय नवीन कोच निवडीची प्रक्रिया सुरु करणार आहे.

वर्ल्ड कप संपल्यावर लगेच कोच पदासाठी मुलाखती सुरु होतील असे सांगितले जात असले तरी असेहि समजते की रवी शास्त्री यांना थेट एन्ट्री असेल त्यांना मुलाखत द्यावी लागणार नाही. सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची समिती या निवड प्रक्रियेत सल्लागार म्हणून काम पाहते आहे. कोच निवड प्रक्रियेत टीमचा कप्तान आणि अन्य खेळाडूंच्या मताचा विचार केला जातो आणि सध्या विराट कोहली तसेच अन्य टीम खेळाडू शास्त्री साठी आग्रही आहेत. शास्त्री यांच्या कोच काळात टीम इंडियाची कामगिरी अतिशय उत्तम झाली आहे आणि सर्व खेळाडू आणि कोच याच्यात चांगला समन्वय दिसून येत आहे.

जुलै अखेर टीम इंडिया वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे त्या अगोदर कोच निवड झाल्यास ते सोयीचे होणार आहे आणि अश्या परिस्थितीत शास्त्री यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment