वडपिंपळाच्या अनोख्या लग्नाला जमले २ हजार वऱ्हाडी

bargad
कोलकाता शहरात नुकताच एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे यात नवरा नवरी अज्ञान होते म्हणजे एक प्रकारे हा बालविवाह होता पण त्याला कुणीही हरकत घेतली नाही. सनई चौघडे, मंत्रोच्चार अशा थाटात हा विवाह झाला आणि यासाठी २ हजार वऱ्हाडी नटून थटून आले. विवाहानिमित्त मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ दिले गेले तसेच सेल्फी फोटो काढले गेले. व्हिडीओग्राफर, केटरर, बँडवाले यांच्याबरोबर वधूचा साजश्रुंगार करण्यासाठी ब्युटीशियन आली होती.

हे लग्न होते दोन झाडांचे. त्यातील वर म्हणून असलेल्या वडाच्या झाडाचे वय आहे १२ वर्षे आणि त्याचे नाव प्रणय. त्याची वधू म्हणून होते पिंपळाचे दोन वर्षाचे झाड आणि त्याचे नाव देवराती. झाले असे कि १२ वर्षापूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाजवळ दोन वर्षापूर्वी पिंपळाचे झाड वाढले. या दोन झाडांच्या मध्ये ६ फुट अंतर आहे. त्यामुळे ही झाडे योग्य जतन व्हावीत म्हणून विवाहसोहळा केला गेला आणि त्याला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. वर झाडाला धोती नेसविली गेली होती तर वधू झाड बनारसी साडी नेसून नटले होते. गोरज मुहूर्तावर बंगाली पद्धतीने हा विवाह झाला. पंडितजी मंत्रोच्चार करत होते. वरपिता गौतम दास यांनी बंगाली प्रथेप्रमाणे दिवसभर व्रत पाळले आणि वधूची देखभाल चांगली करू असे आश्वासन दिले.

Leave a Comment