स्मॉल, मिडीयम किंवा लार्ज नाही, तर येथे मीटरमध्ये मिळतो पिझ्झा

pizza
पिझ्झा ऑर्डर करताना जितके लोक आहेत त्यांच्या हिशोबाने आपण स्मॉल, मिडीयम किंवा लार्ज साईझेसमध्ये पिझ्झा ऑर्डर करीत असतो. यामध्ये वेगवेगळ्या टॉपिंग्जचे पर्याय निवडण्याची मुभाही आपल्याला दिलेली असते. पण अनेकदा आपण मागवीत असलेल्या गोलाकार पिझ्झाचे काठ इतके मोठे असतात, की त्यावर टॉपिंग्ज भरपूर असत नाहीत. तसेच प्रत्येकाच्या आवडी-निवडीप्रमाणे निरनिरळ्या टॉपिंग्जचा आस्वाद घ्यायचा असला, तर त्यासाठी एकाच पिझ्झा न मागविता अनेक लहान मोठ्या साईझेसचे पिझ्झा मागवावे लागतात. पण जर या निरनिराळ्या साईझेसच्या गोलाकार पिझ्झाच्या ऐवजी तुमचा पिझ्झा मीटरच्या लांबीनुसार मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? इटलीतील कॅग्लिअरी येथील ‘न्यू पिझ्झा’ नामक पिझ्झेरिया मध्ये पिझ्झा चक्क मीटरप्रमाणे दिला जातो. ग्राहकांना आवश्यक असेल तितक्या मीटर लांबीचा पिझ्झा ते ऑर्डर करू शकतात. हे पिझ्झा गोलाकार नसून, आयताच्या आकराचे आणि लांबीला जास्त असतात.
pizza1
ज्यांना निरनिरळ्या टॉपिंग्ज चाखून पहायची असतील, त्यांना येथे निरनिराळे पिझ्झा मागविण्याची गरज नसून, निरनिराळे टॉपिंग्ज एकाच लांबलचक पिझ्झाचे अनेक हिस्से करून त्यावर घालून घेता येतात. त्यामुळे एकाच प्रकारच्या टॉपिंगचा आस्वाद न घेता, ग्राहक एकाच पिझ्झावर अनेक तऱ्हेच्या टॉपिंग्जचा आनंद घेऊ शकतात. एक मीटर लांबीच्या पिझ्झावर एकाच वेळी चार निरनिराळी टॉपिंग्ज घातली जाऊ शकतात. या पिझ्झासाठी वापरली जाणारी सर्व टॉपिंग्ज स्थानिक आणि ताज्या पदार्थांचा वापर करून तयार केली जात असल्याने, येथील पिझ्झा झपाट्याने लोकप्रिय होत आहेत.