उत्तर प्रदेशात दिसणार यादवी भाग -२

akhilesh-singh
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या वेळेस समाजवादी पक्षामध्ये यादवीचा पहिला भाग पाहायला मिळायला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात यादवीचा दुसरा भाग पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पूर्वाच्या भागात वडील आणि मुलाचा संघर्ष दिसून आला होता, तर आता भाऊबंदकीचे प्रयोग दिसतील, एवढाच काय तो फरक.

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या हातून त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांनी पाहता पाहता पक्षाची सूत्रे हिसकावून घेतली होती. पक्षामध्ये अमरसिंह यांची ढवळाढवळ होत असल्याचे कारण देऊन अखिलेश यांनी 2016 मध्ये बंड केले होते. अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील त्या वादातून पक्षाचे दोन तुकडे झाले. या दोन्ही तुकड्यांनी मुलायमसिंह हेच हेच आमचे नेते आहेत, असे जाहीर केले ही वेगळीच गंमत होती. अखिलेश यांनी स्वतःला पक्षाध्यक्ष म्हणून राज्याभिषेकही करवून घेतला.

असे असले तरी ते पक्षप्रमुख होताच पक्षातील (म्हणजेच यादव कुटुंबातील) भाऊबंदकी उफाळून वर आली होती. मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला तर त्यांचे आणखी एक बंधू रामगोपाल यादव यांनी अखिलेशची साथ द्यायचे ठरविले. शिवपाल यांनी प्रगतिशील समाजवादी पक्ष काढून सपाला नेस्तनाबूत करण्याचा विडाच उचलला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी तो निश्चय पूर्ण करण्याचा प्रयत्न नव्याने सुरू केला आहे. मुलायमसिंह यांचा मैनपूरी हा मतदारसंघ वगळता सर्वत्र आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली. इतकेच नव्हे तर फिरोझाबादमध्ये रामगोपाल यांचे चिरंजीव अक्षय यांच्या विरोधात स्वतः मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. अखिलेश यांची पत्नी डिंपल यादव यांच्या कन्नोज आणि पुतण्या धर्मेंद यादव यांच्या बदायूं मतदारसंघातूनही शिवपाल हे उमेदवार उभे करणार आहेत.

दुसरीकडे मुलायमसिंह यादव यांची दुसरी सून अपर्णा यादव यांनाही उमेदवारी हवी होती. ती त्यांना मिळाली नाही, त्यामुळे त्याही नाराज आहेत. अपर्णा यादव अखिलेशचा सावत्र भाऊ प्रतीक यादवच्या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांनी 2017 ची विधानसभा निवडणूक लखनऊ कँट मतदारसंघातून लढवली होती. मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव या सर्वांनी अपर्णा यांच्या निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. तरीही त्यांचा पराभव झाला होता.

अखिलेश यांचे चुलत भाऊ स्व. रणधीरसिंह यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांना मुलायमसिंह यादव यांनी राजकारणात आणले होते. मुलायमसिंह यांनी मैनपूरीच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता, तेव्हा याच मतदारसंघातून तेजप्रताप यांनी पोटनिवडणूक लढविली होती. तेजप्रताप हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे जावई आहेत. आता खुद्द मुलायमसिंहच मैनपूरीतून रिंगणात उतरणार म्हटल्यावर त्यांच्याशी आशेवर पाणी फिरले आहे. मैनपूरी नाही तर संभल येथून तरी उमेदवारी मिळेल, असे त्यांना वाटत होते. मात्र तेथील उमेदवार जाहीर झाल्यामुळे तीही शक्यता खुंटली आहे. म्हणून तेजप्रतापही खट्टू आहेत.

समाजवादी पक्षातील अंतर्गत वादाचे प्रमाण एवढे मोठे आहे, की मैनपूरीतून लायमसिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर तेथील पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करावी लागली कारण तेथील कार्यकर्ते तेजप्रताप यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले होते. रामगोपाल यादव यांचा पुतळा जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

उत्तर प्रदेशाच्या राजकारणात यादव कुटुंबाचे मोठे प्रस्थ आहे. राज्याच्या राजकारणातील पहिले कुटुंब असा त्यांचा उल्लेख केला जातो. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत बहुजन समाज पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही, काँग्रेसचे केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधी निवडून आले तर सपाचे पाच खासदार निवडून आले. ते पाचही जण यादव कुटुंबातीलच होते.

त्यामुळे यादव घराण्यात उफाळलेल्या या वादाला महत्त्व आले आहे. आपण ज्यांना प्रादेशिक पक्ष म्हणतो त्यातील बहुतेक पक्ष हे एखाद्या घराण्यावरच आधारित आहेत. समाजवादी पक्षही त्याला अपवाद नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीला जसजशा बहर येईल तसतसा हा वाद आणखी उफाळून येण्याची चिन्हे आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी बसपसारख्या कट्टर प्रतिस्पर्धी पक्षाशी हातमिळवणी करणारे अखिलेश यादव घरातील या महाभारतातून कसा मार्ग काढतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

Leave a Comment