स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी उजव्या हाताच्या बोटाला शाई

election1
मुंबई – राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च रोजी होणाऱ्या राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाऐवजी उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात येणार असल्याची माहिती दिली.

याबाबत माहिती देताना सहारिया यांनी सांगितले की, मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाला पक्क्या शाईने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी निशाणी केली जाते; तसेच डाव्या हाताच्या मधल्या बोटाला पुनर्मतदानाच्यावेळी शाई लावण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी सूचना आहेत. 10 मार्च रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार 11, 18, 23 ते 29 एप्रिल अशा चार टप्प्यांत राज्यात मतदान होणार आहे. साधारणत: एकाच वेळी लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान होत असल्याने शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई न लावता इतर कोणत्याही बोटावर शाई लावावी, असे निर्देश देण्याची विनंती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती.

राज्य निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची विनंती लक्षात घेऊन 24 मार्च रोजी होणाऱ्या 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, 82 सरपंचांच्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुका, विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुका आणि 3 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये डाव्या हाताच्या बोटाऐवजी उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील एकूण जागा व मतदारांची संख्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा अत्यंत कमी असल्यामुळे हा बदल केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, असे सहारिया यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment