काय रे अलिबागवरुन आलास का ? या डायलॉगवर बंदी आणण्यासाठी याचिका

high-court
मुंबई – आपण एखाद्याला हिणवण्यासाठी काय रे अलिबागवरुन आला आहेस का? या डायलॉगचा अनेकदा वापर करतो. पण हा डायलॉग म्हणणे यापुढे महागात पडू शकतो कारण अलिबागचे रहिवासी असलेल्या राजेंद्र ठाकूर यांनी हा डायलॉग वापरुन अलिबागकरांचा अपमान का केला जात आहे ? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

आपल्या याचिकेतून सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काहीतरी ठोस पावले उचलावीत अशी मागणी राजेंद्र ठाकूर यांनी केली आहे. त्याचबरोबर असा डायलॉग किंवा उल्लेख चित्रपट आणि मालिकांमध्ये असल्यास तो सेन्सॉर बोर्डाने काढून टाकावा असा आदेश देण्याचीही मागणी करण्यात आली.

अलिबाग हे आपल्या राज्यातील निसर्ग सौंदर्य लाभलेले महत्वाचे पर्यटनस्थळ असून अलिबागची या डायलॉगमुळे विनाकारण बदनामी होत असल्याचे राजेंद्र ठाकूर यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता ती दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.