ह्या कारणांमुळे तर विवाहबद्ध होण्याचा निर्णय तुम्ही घेत नाही ना?


एके काळी विवाहाचा निर्णय हा ठराविक वेळी, घरातील मोठ्यांच्या निर्णयानुसार घेतला जात असे. पण जसजसा काळ बदलला, तसतसे विचारही बदलत गेले आणि त्यामुळे विवाहसंस्थेची संकल्पना देखील बदलली. एका दृष्टीने हा बदल चांगलाच म्हणायला हरकत नाही. विवाहबंधनात अडकण्यापूर्वी पती पत्नी जाणीवपूर्वक, सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेत असतात. मात्र काही बाबतीत, काही व्यक्ती स्वतःचा, स्वतःच्या भविष्याचा, किंवा मिळत असलेल्या जोडीदाराचा विचार न करता, इतर अनेक कारणांमुळे लग्नाचा निर्णय घेतात.

आजकाल वैचारिक स्वातंत्र्य आले असले, तरी अनेकदा आईवडिलांच्या आग्रहाखातर, त्यांच्या पसंतीचा जोडीदार निवडला जात असल्याचे आपण अनेकदा पाहतो. आई वडील हे मुलीच्या किंवा मुलाच्या सुखाचाच विचार करीत असतात हे जरी खरे असले, तरी आपल्या भावी जोडीदारामध्ये आपल्याला अपेक्षित असलेले गुण आहेत किंवा नाही, त्याच्याबरोबर आपले आयुष्य सर्वार्थाने सुखी होईल किंवा नाही हा विचार करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे जोडीदार निवडण्यापूर्वी त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी, त्याला समजून घेण्यासाठी वेळ दिला जाणे आवश्यक आहे.

अनेकदा मुलाला किंवा मुलीला आपल्या भावी जोडीदारामधील काही गोष्टी खटकत असतात. कधी कधी विचार अजिबात जुळत नसल्याचे देखील जाणवते. अश्या वेळी भावनिक दृष्ट्या असमाधान जाणवू लागते. लग्न हे दोन मनांचे देखील मिलन आहे. त्यामुळे मने जुळत नसतील, तर परस्परांविषयी प्रेम, आदर वाटणे कठीण होते. अश्यावेळी केवळ लग्न ठरले आहे, सर्व तयारी झाली आहे, असा विचार करून काही मुले / मुली मागे न फिरण्याचा निर्णय घेतात. त्यानंतरचे वैवाहिक आयुष्य असमाधानी असू शकते. त्यामुळे नंतर पस्तावण्यापेक्षा वेळीच योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

अनेकदा आपल्या सर्व मित्र मैत्रिणींची लग्न झाली आणि एकटे आपणच उरलो असे वाटून काहींना लग्नाचा निर्णय घ्यावा लागतो. त्यातून घरच्या मंडळींचे प्रश्न, टोमणे, असतातच. ‘ अजूनही लग्न का होत नाही ‘ अश्या अर्थाच्या नजरा त्रासदायक ठरू शकतात. मनासारखा जोडीदार मिळाला नाही म्हणून लग्न झाले नाही हे साधेसे स्पष्टीकरण कोणाला सहजी न पटणारे असते. मुळात किंवा मुलीत काही तरी दोष असला पाहिजे, अश्या छुप्या चर्चा कानी येऊ लागल्याने घरचे देखील लग्नाचा आग्रह धरू लागतात. ह्याच आग्रहाला बळी पडून अधिक विचार न करता लग्नाचा निर्णय घेतला जातो.

कारण कोणते ही असो, लग्नाचा निर्णय संपूर्ण विचारांती घेतला जावा, तरच वैवाहिक आयुष्य समाधानाचे ठरत असते. दाम्पत्य जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या, तरी जोडीदाराची साथ लाभल्याने त्या अडचणींवर यशस्वी मात करता येते. पण जर जोडीदारच मनासारखा नसेल, तर भावनिक पातळीवर, सहजीवन अतिशय असमाधानाचे ठरू शकते.

देशोदेशीच्या विचित्र विवाह रूढी

Leave a Comment