समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातून असीमानंद यांच्यासहित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

asimanand
नवी दिल्ली – पंचकुला येथील विशेष एनआयए न्यायालयाने स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये दरम्यान धावणारी समझोता एक्सप्रेस ही साप्ताहिक ट्रेन असून समझोता एक्सप्रेसमध्ये १८ फेब्रुवारी २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यात बहुसंख्य प्रवासी पाकिस्तानी नागरीक होते.

हा बॉम्बस्फोट पाकिस्तानी मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या हेतूने घडवण्यात आला असल्याचे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. पानिपत जवळील दिवानी गावामध्ये समझोता एक्सप्रेस असताना हा बॉम्बस्फोट झाला. ही ट्रेन त्यावेळी अटारीच्या दिशेने जात होती. अटारी हे या ट्रेनचे भारतातील शेवटचे स्थानक आहे.

या बॉम्बस्फोटात अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथीय संघटनेचे सदस्य असीमानंद यांना आरोपी बनवण्यात आले होते. या आरोपत्रात लोकेश शर्मा, सुनील जोशी, संदीप डांगे आणि रामचंद्र कालासांग्रा याचे नाव सुद्धा होते. २००७ साली मध्य प्रदेश देवास येथे या स्फोटाचा मास्टरमाईंड सुनील जोशी मृतावस्थेत सापडला होता. पण आज न्यायालयाने असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली.

Leave a Comment