या मंदिरात दुर्योधनाला वाहिली जाते मदिरा

appoopan
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. याची प्रचीती आपल्याला वेगळ्या भाषा, वेगळी जीवनपद्धती, वेगळ्या संस्कृती यातून येतेच पण मंदिरातील पूजा पाठ यातूनही ही विविधता दिसते. आपल्याकडे सर्वसामान्यपणे पांडव हे सज्जन अन कौरव दुर्जन असा समज आहे. त्यामुळे कौरव राजा दुर्योधन याला पूजण्याची प्रथा नाही. कारण तो नकारात्मकतेचे प्रतिक समजला जातो. पण केरळ मधील कोल्लम जिल्यात एदावक्कड येथे दक्षिण भारतातील एकमेव दुर्योधन मंदिर असून येथे त्याला अप्पोप्पन नावाने संबोधले जाते.

विशेष म्हणजे या पोरुवाझी पेरुविलाथीमलानाडा दुर्योधन मंदिरात पूजेमध्ये देवाला दारू अर्पण केली जाते. दरवर्षी येथे वार्षिकोत्सव होतो तसा तो यंदाही साजरा झाला आणि उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ओल्ड माँक मद्याच्या १०१ बाटल्या वहिल्या गेल्या. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार येथील पुजारी जगदीश यांनी दिलेल्या माहितीनुसार वास्तविक येथे ताडी आणि दारू वाहिली जाण्याची प्रथा आहे त्याचबरोबर चिकन, पान, बकरी, सिल्कचे कपडे अर्पण केले जातात त्यात विदेशी मद्य सुद्धा वाहिले जाते. सर्व धर्माचे लोक येथे पूजा करतात आणि विदेशातून येणारे लोक अनेक प्रकारचे मद्य येथे वाहण्यासाठी घेऊन येतात.

या मंदिराची पौराणिक कथा अशी सांगितली जाते, एकदा दुर्योधन फिरतफिरत या गावात आला होता तेव्हा त्याला तहान लागली आणि त्याने एका घरात पिण्यासाठी पाणी मागितले. त्या घरातील लोकांनी त्याला ताडी प्यायला दिली. ती चव त्याला आवडली आणि लोकानी हेच लक्षात ठेऊन जेव्हा त्याचे मंदिर बांधले गेले तेव्हा त्याला ताडीचा नैवेद्य सुरु केला. यामुळे या गावातील लोकांचे दुर्योधन आराध्य दैवत असून त्याला मद्य अपर्ण केले कि तो भाविकांचे सर्व संकटापासून रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. या मंदिरात दुर्योधनाची मूर्ती नाही पण पीठम आहे.

Leave a Comment