आयसीसीसोबत केलेल्या या करारामुळे भारताला पाकिस्तानसोबत खेळावेच लागणार

dave-richardson
आगामी विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याला कोणतीही अडचण नाही. दोन्ही संघ आयसीसीसोबत खेळण्यासाठी वचनबद्ध आहेत. त्यामुळे १६ जूनला मँचेस्टर येथे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हा वेळापत्रकानुसारच होईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी म्हटले आहे.

पुलवामात गेल्या महिन्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४० पेक्षा जास्त सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला होता. भारताने त्यानंतर पाकिस्तानशी कोणत्याही पातळीवर क्रिकेट संबंध ठेवू नये अशी जोरदार मागणी होत असल्यामुळे विश्वचषकातील भारत-पाक सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण विश्वचषकातील सर्व सामने हे ठरल्याप्रमाणेच होतील, असे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिचर्डसन म्हणाले की, एका करारावर विश्वचषकातील सर्व सहभागी संघांनी स्वाक्षरी केली असल्यामुळे प्रत्येक संघाला प्रत्येक सामना खेळणे आवश्यक आहे. जर एखाद्या संघाने खेळण्यास नकार दिला तर विरोधी संघाला गुण दिले जातील.

Leave a Comment