लोकसभा निवडणूकीत सायकलवर स्वार होणार संजय दत्त ?

sanjay-dutt
लखनौ : सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात बी टाऊनचा बाबा अर्थात संजय दत्त आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या वेळीच्या निवडणुकीत संजय दत्त समाजवादी पक्षाच्या तिकीटवर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून उभा राहणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. वडील सुनील दत्त, बहिण प्रिया दत्त हिच्यानंतर संजय दत्तदेखील आता लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. परंतु संजय दत्त निवडणूक लढवू शकत नाही. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगलेला अपराधी भारतीय कायद्यानुसार लोकप्रतिनिधीपदास अपात्र असतो. संजय दत्तने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संजय दत्त निवडणूक लढवू शकत नाही.

संजय दत्तने 10 वर्षांपूर्वी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. संजय दत्त 2009 साली सपाच्या तिकिटावर लखनौ येथून लोकसभा लढवणार होता. तशी घोषणादेखील संजय दत्तने केली होती. परंतु संजय ती निवडणूक काही कारणास्तव लढू शकला नाही. आता पुन्हा एकदा संजय दत्त लोकसभा लढवणार असल्याच्या बातम्या अनेक इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळांनी दिली आहे. संजय दत्तने 2009 मध्ये सपाचे नेते अमर सिंह यांच्या आग्रहामुळे समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु नंतरच्या काळात अमरसिंह यांनी सपाला रामराम केल्यानंतर संजय दत्तनेदेखील पक्षाशी फारकत घेतली.

Leave a Comment