स्वच्छ प्रतिमेचा साधा नेता मनोहर पर्रीकर

manohar
देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे चारवेळचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे कॅन्सरच्या आजाराने रविवारी सायंकाळी निधन झाले आणि या अतिशय साध्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याच्या आठवणीना उजाळा मिळाला. पर्रीकर आयआयटी मधून उच्च शिक्षण घेतलेले देशातले पहिले मुख्यमंत्री होते तसेच उच्चशिक्षितांचे राजकारणात काय काम या प्रश्नाचे सडेतोड उत्तरही होते. गोव्यात भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा पराक्रम त्यांनी केला होताच पण गोव्यातील सर्वसामान्य माणसाला भेटीसाठी कधीही उपलब्ध असणारे ते महान नेते होते.

पर्रीकर यांनी वयाच्या २६ व्या वर्षी आरएसएस स्वयंसेवक म्हणून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आणि रामजन्मभूमी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. संघानेच त्यांना भाजप मध्ये पाठविले आणि १९९४ मध्ये ते गोवा विधानसभेत निवडून आले. अवघ्या चार वर्षात म्हणजे १९९९ मध्ये तो विरोधी पक्ष प्रमुख बनले आणि २४ ऑक्टोबर २००० मध्ये ते गोव्याचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी तीन वेळा हे पद भूषविले.

yogesh
पर्रीकर यांच्या पत्नी मेधा यांचेही २००१ साली कॅन्सरनेच निधन झाले होते. तेव्हा ते गोव्याचे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा दोन लहान मुलांना शाळेत सोडून स्कूटरवरून मंत्रालयात येणारे ते बहुदा पहिलेच मुख्यमंत्री असावेत. सर्वसामान्य गोवेकराप्रमाणे अनेकांनी त्यांना त्याच्या स्कूटरवरून रस्त्यातून जाताना अनेकदा पहिले आहे. विशेष म्हणजे त्यांना कुणीही भेटू शकत असे आणि तेही सर्वसामान्य नागरिक असल्याप्रमाणेच वागत असत.

उरी द सर्जिकल स्ट्राईक या गाजलेल्या चित्रपटात पर्रीकर याची भूमिका करणारे नट योगेश सोमण यांनी पर्रीकर यांना श्रद्धांजली देताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या चित्रपट पर्रीकर असे नाव वापरले गेलेले नाही. सोमण म्हणतात माझ्या आणि पर्रीकर यांच्या चेहऱ्यात थोडेफार साम्य होते आणि त्यांची भूमिका मला साकारायला मिळाली हे माझे सौभाग्य आहे.

Leave a Comment