आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी ‘मुद्रा थेरपी’


तुमचा आरोग्य तुमच्या हातात आहे असे म्हटले तर ते खोटे ठरणार नाही. आपल्या हाताची पाच बोटे ‘ पंचतत्वे ‘ समजली गेली आहेत. या पंचतत्वांनी सर्व सृष्टीचे निर्माण झाले आहे असा उल्लेख आपल्या शास्त्रांमध्ये सापडतो. आपल्या हाताची पाच बोटे, पृथ्वी, वायू, जल, आकाश आणि अग्नी ही पंचतत्वे दर्शवितात. आपल्या हाताचा अंगठा अग्नीचे, तर्जनी वायूचे, मधले बोट आकाशाचे, अनामिका पृथ्वीचे आणि करंगळी जल, म्हणजेच पाण्याचे प्रतीक आहे. ह्या पंच तत्वांमध्ये संतुलन असले, तर आपल्या शरीरामध्ये देखील संतुलन राहते. शरीरामध्ये संतुलन राखण्याकरिता हाताची बोटे काही विशिष्ट प्रकारे जुळवून निरनिराळ्या हस्त मुद्रा केल्या जातात. ह्या निरनिराळ्या मुद्रा निरनिराळ्या प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ह्यालाच मुद्रा थेरपी असे म्हटले गेले आहे.

तर्जनी आणि अंगठा जुळविलेल्या मुद्रेला ज्ञान मुद्रा म्हटले गेले आहे. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी ही मुद्रा उपयोगी आहे. म्हणूनच ध्यान धारणा करताना ह्या मुद्रेचा वापर केला जातो. डिप्रेशन, सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची काळजी, निद्रानाश, मानसिक तणाव यांसाठी ही मुद्रा विशेष गुणकारी आहे. अनेकदा अशी परिस्थिती उद्भवते, जेव्हा आपली चिडचिड होते, किंवा सहनशक्ती संपुष्टात येऊ लागते, अश्या वेळी ही मुद्रा उपयोगी ठरते.

ध्यानास बसल्यानंतर डाव्या हातावर उजवा हात ठेऊन, दोन्ही हात आपल्या पोटाशी ठेवल्या गेलेल्या मुद्रेला ध्यान मुद्रा म्हटले गेले आहे. मानसिक तणाव कमी करुन मन:शांती प्रदान करणारी ही मुद्रा आहे. करंगळी आणि अंगठा जुळवून वरूण मुद्रा होते. करंगळी पाण्याचे प्रतीक असल्याने ह्या मुद्रेला वरूण मुद्रा म्हटले गेले आहे. शरीरामध्ये डीहायड्रेशन होत असल्यास ही मुद्रा उपयोगी ठरते. तसेच ही मुद्रा रक्तशुद्धीकरण आणि त्वचेचा कोरडेपणा घालविण्यास सहायक आहे.

वजन घटविण्यासाठी सूर्य मुद्रा सहायक आहे. यासाठी हाताची अनामिका अंगठ्याच्या मुळाशी आणून त्यावर अंगठा दुमडून अंगठ्याने अनामिकेवर हलका दाब द्यावा. शरीराचा लठ्ठपणा घालविण्यासाठी ही मुद्रा उपयोगी ठरते. आयु मुद्रा ही शरीरामध्ये होत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या वेदना शमविण्यासाठी उपयुक्त आहे. या मुद्रेसाठी हाताची तर्जनी अंगठ्याच्या तळाशी दाबून त्यावर अंगठ्याने दाब द्यावा. शरीरामध्ये वात असल्याने वेदना होत असल्यास ह्या मुद्रेमुळे आराम मिळण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना संधिवात असेल, त्यांच्यासाठी ही मुद्रा उपयुक्त आहे.

ज्यांना वजन वाढवायचे असेल, त्यांच्यासाठी पृथ्वी मुद्रा उपयुक्त आहे. ह्यासाठी अनामिका आणि अंगठा जुळवून ही मुद्रा करावी. ही मुद्रा दररोज काही काळासाठी केल्याने इच्छित परिणाम दिसून येतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्राण मुद्रा सहायक आहे. ह्या मुद्रेच्या परिणामस्वरूप त्वचा सुंदर दिसू लागते, शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते, आणि ज्या व्यक्तींना डोळ्यांशी निगडीत काही समस्या असतील, त्या ही या मुद्रेमुळे दूर होण्यास मदत मिळते. ह्या मुद्रेसाठी अंगठा, अनामिका आणि करंगळी यांची टोके जुळवावीत. उर्वरित दोन्ही बोटे सरळ ठेवावीत.

आपण मुद्रा श्वसनरोगांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपयुक्त आहे. ह्यासाठी हाताचे मधले बोट, आणि अनामिकेला अंगठ्याने स्पर्श करायचा आहे. तर्जनी आणि करंगळी सरळ, ताठ असावीत. दोन्ही हातांची मूठ करून केवळ अंगठा ताठ ठेवण्याला लिंग मुद्रा म्हटले आहे. शरीरातील कफ दोष कमी करण्यासाठी या मुद्रेचा वापर होतो. हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी हृद्य मुद्रा करावी. ह्या मुद्रेने उच्च रक्तदाबासारख्या व्याधीमधेही गुण दिसून येतो. ह्यासाठी तर्जनी अंगठ्याच्या मुलाशी ठेऊन अंगठ्याने मधले बोट आणि अनामिकेच्या टोकाला स्पर्श करावा. करंगळी ताठ ठेवावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही