दाढीमिशा ठेवा आणि आरोग्यसंपन्न रहा

beard
वाढलेली दाढी आणि मिशा आरोग्यासाठी उपयुक्त असतात या विधानावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. अगदी दाढीमिशा वाढविणारे लोकही नाही. पण हे खरे आहे. वाढलेली दाढी व मिशा हे आळसाचे व घाणेरडेपणाचे लक्षण मानले जात असले तरी दाढी मिशा आरोग्य राखण्यात महत्त्वाची मदत करतात. आजकाल फॅशन म्हणून दाढी मिशा वाढविल्या जातात मात्र बहुतेकजण रोज सकाळी दाढी घोटणे हा कार्यक्रम न चुकता करण्याबाबतही जागरूक असतात. पुरूष करतात ते सर्व महिलाही करू शकतात हा महिला वर्गाचा वृथा अभिमान दाढी मिशा वाढवून पुरूष मोडू शकतात हाही यातला एक फायदा आहेच.

मात्र खरोखरच दाढी मिशा वाढविण्याचे अनेक फायदे आहेत. ते याप्रमाणे. सूर्यकिरणातील अतिनील किरणांमुळे त्वचा काळी पडते मात्र दाढी मिशांमुळे त्वचा टॅन होण्याचा धोका राहात नाही कारण या किरणांपासून दाढी चेहर्‍याचे संरक्षण करते. तसेच धुळीपासून अॅलर्जी असणार्‍यांसाठी दाढी व मिशा फिल्टरचे काम करतात त्यामुळे ही धूळ थेट नाकात शिरू शकत नाही व जंतूंना आत प्रवेशच न मिळाल्याने अॅलर्जी येत नाही.

beard1
चेहर्‍यावरच्या सुरकुत्या लपविण्यासाठीही दाढी उपयुक्त ठरते. तसेच काळे स्पॉट व त्वचेच्या अन्य तक्रारींमागे दाढी करताना वापरले जाणारे रेझर कारणीभूत असते. दाढी वाढविली की हा प्रश्न सुटतो. चेहर्‍यावरचे डाग लपविण्यासही दाढी मदत करते.जोरदार वारा चेहर्‍यावर बसला तर चेहरा कोरडा पडतो व सुकलेला दिसतो. दाढी मिशांमुळे चेहर्‍याच्या त्वचेचा ओलावा कायम राहतो.

एक माणूस आयुष्यात किमान ३३५० तास म्हणजे ५ महिने दाढी करण्यासाठी घालवितो. दाढी वाढविली की हा वेळ वाचतो. भरदार मिशा व दाढीमुळे हवेतील अपायकारक जंतू थेट तोंडात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे घशाला इन्फेक्शन होण्याची भीती कमी होते. थंडीपासूनही दाढी घशाचे रक्षण करते. दाढीमुळे शरीराचे तापमान थोडे जास्त राहते व त्यामुळे सर्दी, पडसे, दमा, यापासून संरक्षण मिळते.

beard2
चेहर्‍यावर असलेली मुरूमे दाढी करताना अनेकदा कापली जातात व त्यामुळे इन्फेक्शनचा धोका अ्रसतो. दाढी वाढविली की हा प्रश्न येत नाही. त्यामुळे दाढी वाढविण्यावरून बायको अथवा घरातील कुणीही कितीही टीका केली तरी घाबरू नका आणि दाढी मिशा बिनधास्त वाढवा. शेवटी आरोग्याचा प्रश्न आहे ना!

Leave a Comment