दाढी-मिशी लावून सोंग करणाऱ्यांनी संभाजी-शिवाजी महाराजांबद्दल सांगण्याची गरज नाही

combo
पुणे : मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले आमदार शरद सोनवणेंनी खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज बद्दल सांगायचे काम करू नये, असा घणाघात अभिनेते अमोल कोल्हेंवर केला. राष्ट्रवादीकडून शिरुरमधील लोकसभेची उमेदवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या अमोल कोल्हेंना मिळाली आहे.

मी निधड्या छातीचा मराठा, मी शिवरायांचा पाईक, असल्याचे म्हणत शिरुरमधील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनीही आपले मराठा कार्ड बाहेर काढले. राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुर लोकसभेसाठी अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर करताच, अशा आरोपांच्या फैरी अवघ्या काही तासात झडू लागल्या आहेत. एकूण आरोप पाहता शिरुर लोकसभेची निवडणूक ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका आणि जातीच्या राजकारणात अडकून राहणार असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संभाजी महाराजांच्या मालिकेवर राजकारण न करण्याचे आवाहन अमोल कोल्हे यांनी पहिल्याच दिवशी केले होते. पण त्यांना याच मुद्द्यावर विरोधक घेरणार हे आता स्पष्ट झाले आहे. आधी शिवाजी महाराज आणि आता संभाजी महाराजांच्या भूमिकेतून कोल्हेंनी घराघरात स्थान मिळवले आहे.

पण लोकांच्या मनातील अमोल कोल्हेंचे स्थान डोईजड ठरताना दिसत असल्याचे पाहून प्रतिस्पर्धी आढळराव यांनी देखील त्याच विषयात हात घातला. म्हणूनच त्यांनी शिवजन्मभूमी शिवनेरी गड ते शंभूराजांच्या स्मृतिस्थळी म्हणजेच वढू तुळापूर अशी रॅली काढली. शिरूर लोकसभा मतदारसंघातच दोन्ही महाराजांचा हा ठेवा येतो.

या रॅलीनंतर झालेल्या सभेत बोलताना आढळरावांनी म्हटले की, मी निधड्या छातीचा मराठा, मी शिवरायांचा पाईक आहे, तेव्हा मला कुणी आव्हान देऊ नये. तर खोटी दाढी-मिशा लाऊन तुम्ही आम्हाला संभाजी-शिवाजी महाराजांबद्दल सांगायचे काम करु नका, असा टोला शरद सोनावणे यांनी लगावला. त्यामुळे शरद सोनावणे आणि आढळराव पाटील यांच्या टीकेनंतर अमोल कोल्हे यावर काय प्रतिक्रिया देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र आरोप प्रत्यारोप करताना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपप्रचार होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment