प्लास्टीक कपातून चहाचा आस्वाद धोकादायक

tea
चहाची तलफ ही प्रत्येकालाच येत असते आणि लगोलग चहाची फर्माईश होते. मग कधी काचेच्या ग्लासात तर कधी चीनीमातीच्या कपात आणि घराबाहेर असाल तर प्लास्टिकच्या कपमध्ये चहा आपल्या समोर येतो. मात्र, प्लास्टिकच्या कपमध्ये चहा घेणारे आणि प्लास्टिक कोटेड भांड्यामध्ये भोजन करणार्‍यांनो जरा सावधान ! अशा कपने चहा घेणारे आणि भांड्यामध्ये जेवण करणारे लोक नपुंसक होऊ शकतात.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या बायो केमिस्ट्री विभागातील संशोधक प्रा. एस.पी.सिंह यांना असे अढळून आले आहे की, प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात गरम पदार्थ टाकल्यानंतर त्यातून ’बीस फिनॉल ए’हे तयार होते. आणि ते खाल्यानंतर लोक नपुंसक होऊ शकतात. याबाबत उंदरावर प्रयोग करण्यात आले. यात अनेक आश्चर्यकारक परिणाम समोर आले आहेत.

सलग २१ दिवस ज्या उंदरांना ’बीस फिनॉल ए’ देण्यात आले त्यांच्या स्पर्मची मात्रा कमी झाली. तसेच प्रजननानंतर सर्वसाधारण उंदरांच्या तुलनेत यांना होणार्‍या पिलांची संख्या कमी झाली. एवढेच नाही तर उंदरांच्या गर्भधारणेतही अनेक समस्या निर्माण झाल्या. संशोधकाचे म्हणणे आहे की, मानवावरही याचा हाच परिणाम होतो. जर त्यांनी देखील प्लास्टिकच्या भांड्यातील गरम पदार्थ ग्रहण केले तर नपुंसकता येऊ शकते.

tea

देशातून प्लास्टिक निर्मूलन केले जावे यासाठी शासन-प्रशासन स्तरावर मोठे प्रयत्न सुरु आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थाही प्लास्टिकला विरोध करताना दिसतात. मात्र, अद्याप याचे निर्मूलन झालेले नाही. चहाच्या टपरीवर, ऑफिसमधील कँटीनमध्ये प्लास्टिक कपचा सर्रास वापर केला जातो. कदाचित आपणही असे करत असाल. या संशोधनात नपुंसकते बरोबरच मधुमेह, मेंदूवर परिणाम, ह्रदय रोग यांचा धोका संभवतो, असे संशोधकांचे मत आहे.

बीस फिनॉल ए’एवढे धोकादायक आहे की, हे सरळ रक्तात मिसळते आणि त्यामुळे मधुमेहाची शक्यता बळावते. शरीराच्या इतर भागातही ते हळुहळू आपले काम दाखवायला सुरुवात करते. हे संपूर्ण संशोधन अमेरिकेच्या ऑफसेट बुक मध्ये प्रकाशित झाले आहे. त्यावर परदेशातही मोठी चर्चा सुरु आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment