न्यूझीलंडमधील हल्ल्याबाबत दुःख व्यक्त करणाऱ्या सानियाला नेटीझन्सनी झापले

sania-mirza
शुक्रवारी न्यूझीलंडमधील साऊथ आयलँडवरील ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशीदींमध्ये गोळीबार करण्यात आला. ४९ निष्पाप नागरीकांचा मशिदीत करण्यात आलेल्या या गोळीबारात मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले. दोन भारतीय नागरिक देखील या हल्ल्यात जखमी झाले असून नऊ जण अद्याप बेपत्ता आहेत. मशिदीत संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा गर्दी होती, हा गोळीबार तेव्हा करण्यात आला. हल्लेखोराने हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला होता. हल्लेखोराने त्याचबरोबर याचे लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले होते. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्याचबरोबर ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली होती.


दरम्यान भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने या हल्ल्यानंतर ट्विट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. तिने ख्राईस्टचर्च असा शब्द लिहून तीन दुःखद भावना व्यक्त करणारे ईमोजी वापरत याबाबत ट्विट केले आहे. पण तिच्यावर या ट्विटनंतर नेटिझन्सने जोरदार टीका केली. तसेच एवढ्या गंभीर घटनांसाठी ईमोजी वापरणे कितपत योग्य आहे? असा सवाल देखील तिला ट्रोल करत केला आहे. हेच दुःख किंवा निषेध सानियाने पुलवामा किंवा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी का व्यक्त केला नाही? असे प्रश्नही तिला विचारण्यात आले. पुलवामा हल्ल्यानंतर सानियाने आपल्या भावना एक फोटो-ट्विट करत व्यक्त केल्या होत्या.

Leave a Comment