आयुर्वेदाकडे दुर्लक्ष नको

सध्या गुणवत्तावान विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी शाखा निवडण्याकडे कल दिसत आहे. पूर्वी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन्ही शाखांकडे ओढा असे. परंतु आता देशाची औद्योगिक प्रगती झपाट्याने होत आहे, त्यामुळे अभियंत्यांची जास्त गरज आहे म्हणून अभियांत्रिकीकडे जास्त ओढा आहे. त्या मानाने वैद्यकीय शाखेकडे तुलनेने कमी ओढा दिसत आहे आणि जोकाही ओढा आहे तो ऍलोपॅथीकडे आहे.
ayurveda
आयुर्वेदिक डॉक्टर होण्यात मुलांना फारसा रस नाही. कारण रुग्णांचाही ओढा ऍलोपॅथीकडेच आहे. पर्यायाने ऍलोपॅथीमध्ये  व्यावसायिक संधी खूप आहेत. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर होण्यास मुले-मुली तयार नसतात. त्यांच्या पालकांचाही ओढा आयुर्वेदाकडे नसतो. ज्यांना एम.बी.बी.एस.ला प्रवेश मिळत नाही तेच लोक नाईलाज म्हणून आयुर्वेदाकडे वळतात आणि आयुर्वेदिक पदवी मिळवून शेवटी आपल्या रुग्णांवर आयुर्वेदिक इलाज करण्याच्या ऐवजी ऍलोपॅथीचेच इलाज करायला लागतात. त्यातूनच आयुर्वेदिक डॉक्टरांनी ऍलोपॅथीक उपाय, उपचार करावेत की नाही असा वाद निर्माण झालेला आहे. पण अशा प्रॅक्टिसमधून मुळात आयुर्वेदिक डॉक्टरांचाच आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टीकोन स्पष्ट होतो.
ayurveda1
वास्तवात आयुर्वेद हे शास्त्र आपणच एवढी उपेक्षा करावी असे निकृष्ट दर्जाचे नाही. विशेषत: पाश्‍चात्य देशांमध्ये डॉक्टर आणि रुग्णांचा आयुर्वेदाकडचा ओढा वाढत चाललेला आहे. त्यामुळे भविष्यात आयुर्वेदाला महत्व येणार आहे आणि आयुर्वेदिक डॉक्टरांचे महत्व वाढणार आहे. हे लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी एक करिअर म्हणून आयुर्वेदाचा गंभीरपणे विचार करावा.
ayurveda2
भारतामध्ये अजून तरी शुद्ध आयुर्वेदाचे शिक्षण देणार्‍या संस्था आहेत. `बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन ऍन्ड सर्जरी’ ही पदवी देणारे १५० महाविद्यालये देशात आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी साडेपाच वर्षे आहे. ही पदवी प्राप्त केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाची सुद्धा सोय भारतामध्ये असून ती करणारी ३० महाविद्यालये आहेत. सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन ही संस्था आयुर्वेदिक महाविद्यालयांचा दर्जा राखला जात आहे की नाही यावर लक्ष ठेवत असते.
ayurveda3
बी.ए.एम.एस. पदवी घेतलेल्या डॉक्टरांना परदेशात तर चांगली संधी आहेच, पण भारत सरकार सुद्धा या पदवीधरांना आपल्या वैद्यकीय सेवेमध्ये घेत असते. भारतामध्ये सध्या मोठी रुग्णालये वाढत आहेत. काही काही रुग्णालयातून १०० ते १५० डॉक्टर्स असतात आणि अशा रुग्णालयांच्या संचालकांनी आपल्या डॉक्टरांच्या ताफ्यामध्ये काही आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा असावेत असा कटाक्ष ठेवलेला आहे. त्यामुळे मोठ्या रुग्णालयात सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरांना नोकरी मिळू शकते. स्वतंत्र व्यवसाय करणार्‍यांना तर चांगलीच संधी आहे. पंचकर्म, योग, प्राणायाम इत्यादी उपचार आयुर्वेदाशी संबंधित आहेत.

Leave a Comment