मोदींनी चीनचे दौरे चायनीज रेसिपी शिकण्यासाठी होते का?

dhananjay-munde
मुंबई – पुलवामा येथे सीआरपीएफ जवानाच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड आत्मघाती हल्ल्यास जबाबदार असलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रयत्नांमध्ये चीनने पुन्हा एकदा खोडा घातला. चीनने पुन्हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात नकाराधिकाराचा वापर करत त्याला दहशतवादी घोषित करण्यास नकार दिल्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर निशाणा साधला आहे.

पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कित्येकदा चीनचा दौरा केला. गुजरात भेटीसाठी खास चीनचे राष्ट्राध्यक्षदेखील आले होते. चीनने तरीदेखील मसूद अजहर प्रकरणात भारताविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत हे दौरे ढोकळा आणि चायनीज रेसिपीज शिकण्यासाठी होते का? असा सवाल मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.


फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या देशांनी पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी जैशने घेतल्यानंतर भारताची बाजू घेत २७ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास आक्षेप घेण्याबाबत समितीच्या सदस्यांना १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. बुधवारी ही कालमर्यादा संपल्यानंतर समिती सदस्यांच्या मताच्या आधारे याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यात अपेक्षेनुसार चीनने या प्रस्तावासंदर्भात नकाराधिकार वापरला. चीनने या प्रस्तावाला विरोध करताना पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीचा मुद्दा उपस्थित केला.

Leave a Comment