
मुंबई – मुंबईत एकाच वेळी महापालिका, राज्य सरकार, म्हाडा अशा अनेक प्रशासनांची कामे सुरू असतात. त्यांच्या काम लवकर पूर्ण करण्याची जणू शर्यतच सुरू असते. त्यामुळे कामांच्या वेगावर आणि गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो, असे शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनात म्हटले आहे. सीएसएमटी जवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी घडली होती. सेनेने त्याचे खापर प्रशासनावर फोडले आहे.
सीएसएमटी दुर्घटना केवळ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे – शिवसेना
शिवसेनेने त्याचबरोबर मुंबईत आतापर्यंत झालेल्या अपघातांची उजळणी केली आहे. मुंबईचा अनियंत्रित विस्तार, नागरी सुविधांवर पडणारा ताण, बिघडलेले शहर नियोजन हे याला जबाबदार असल्याचे सामनात म्हटले आहे. प्रशासनातील गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे नागरी सुविधा, इतर व्यवस्था, दुरुस्ती देखभाल करणे अवघड आहे. महापालिका, राज्य सरकार, म्हाडा, रेल्वे अशा अनेक प्रशासन यंत्रणा एकाच वेळी काम करतात. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होतो, असे शिवसेनेने म्हटले आहे.
उच्चस्तरीय या अपघाताची चौकशी होईल. दोषींविरोधात कारवाई होईल. पण, या दुर्घटनेचा विरोधी पक्ष राजकारणासाठी वापर करतील, अशी शक्यता शिवसेनेने वर्तविली. कुणीही या अपघाताला जबाबदार असले तरी त्यात जीव गेलेली माणसे आपलीच होती. आम्हाला त्याचे दुःख असल्याचे शिवसेनेने सामनात म्हटले आहे. केलेल्या कामांचे रि-ऑडिट करण्याची वेळ का आली, याचा विचार प्रशासन यंत्रणांनी करावा असे सांगून शिवसेनेने प्रशासनाकडे बोट दाखवले आहे.
