लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत बहनजी!

mayawati
लखनौ – यंदाची लोकसभा निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती लढवणार नसल्याचे संकेत मिळत असून मायावती आतापर्यंत ज्या मतदार संघातून निवडणूक लढवत आल्या आहेत तेथून त्यांनी दुसरा उमेदवार उभा केला असल्यामुळे त्या यंदाची निवडणूक लढवणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर त्या आघाडीच्या प्रचारासाठी आपली संपूर्ण शक्ती लावणार असल्याची चर्चा आहे.

बिजनौर आणि आंबेडकरनगर या मतदार संघातून आतापर्यंत मायावती निवडणूक लढवत आल्या होत्या. पण त्यांनी या जागांवर दुसरे उमेदवार घोषित केले असल्यामुळे ही निवडणूक मायावती लढवणार नसल्याचे स्पष्ट आहे. तर, उत्तर प्रदेशामध्ये त्या संपूर्ण निवडणूक काळात जवळपास १२ जनसभा घेण्याची तयारी करत आहेत. दरम्यान अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव आणि आघाडी केलेल्या पक्षांसाठी मायावती प्रचार करणार आहेत.

बसप आणि आघाडीसाठी मायावती या एकच स्टार प्रचारक मानल्या जात आहेत. त्यांनी एखाद्या मतदार संघातून निवडणूक लढवल्यास त्या फक्त मतदार संघापूरत्या मर्यादित राहतील. त्यांनी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक न लढवल्यामुळे त्या आघाडीसाठी रणनीती आखण्यास मुबलक वेळ देऊ शकणार आहेत.

काँग्रेससोबत मायावती आणि अखिलेश यादव यांनी आघाडी केली नसली तरी, सोनिया गांधी (राय बरेली) आणि राहुल गांधी (अमेठी) यांच्या जागांवर उमेदवार उभे करणार नसल्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत आघाडीच केली असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment