चीनविरोधात ट्विटर ट्रेंड होत आहे #BoycottChineseProducts हॅशटॅग

china
नवी दिल्ली – पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. भारतीय चीनच्या या निर्णयामुळे चांगलेच संतापले आहेत. त्याच पार्श्वभूमिवर ट्विटरवर #BoycottChina आणि #BoycottChineseProducts हे हॅशटॅग सध्या ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे.

13 मार्चला मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठीच्या प्रस्तावाची मुदत संपणार होती. भारताने त्याआधीच अनेक देशांच्या प्रतिनिधींना भेटून मोर्चेबांधणी केली होती. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने या वेळी त्याला वेगळे महत्त्व होते. दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टन येथे अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांची परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी भेट घेऊन चर्चा केली होती, दहशतवादाबाबत त्यात चिंता व्यक्त करण्यात आली होती. भारताच्या मोर्चेबांधणीला यशही आले होते. या प्रस्तावात १० हून अधिक देशांनी भारताची साथ दिल्याचे समजते. पण चीनने खोडा घातल्याचे समोर आले आहे. चीनने चौथ्यांदा नकाराधिकाराचा वापर केला आहे. सुरक्षा मंडळाचा चीन हा स्थायी सदस्य असून चीनचे पाकिस्तानसोबत चांगले संबंध आहे. चीनने यापूर्वी देखील अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर २००९, २०१६, २०१७ असा तीनदा नकाराधिकार वापरला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही चीनचा निर्णय निराशाजनक असल्याचे आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.

दरम्यान भारतीयांनी ट्विटरवर भारतीयांनी #BoycottChina आणि #BoycottChineseProducts या दोन हॅशटॅगच्या माध्यमातून चीनी उत्पादनांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. #ChinaBacksTerror हा हॅशटॅग वापरून चीन दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने असल्या देशातील उत्पादने वापरणे भारताने बंद करावे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment