तिरुपतीचे व्हीआयपी दर्शन बंद

balaji
आगामी निवडणुका लक्षात घेऊन तिरुमला तिरुपती देवस्थानम प्रशासनाने बालाजीच्या व्हीआयपी दर्शनावर बंदी घातली असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शनासाठी आजी, माजी राजकीय नेते, पक्ष नेते प्रतिनिधी यांनी पाठविलेल्या पत्रांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०१४च्या निवडणूक काळातही असेच व्हीआयपी दर्शन बंद केले गेले होते. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे अशी विनंती देवस्थान प्रशासनाकडून केली गेली आहे. मंदिर तसेच आसपासच्या परिसरात राजकीय प्रचार करू नये असेही आवाहन केले गेले आहे. हे ठिकाण भगवान बालाजीचे निवासस्थान आहे येथे राजकीय प्रचार केला जाऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे.

अर्थात एखाद्या नेत्याने स्वतः पत्र लिहिले तर प्रोटोकॉल प्रमाणे त्यानुसार विचार केला जाईल असे प्रशासनने जाहीर केले आहे. बालाजीच्या दर्शनासाठी केवळ भारतातूनच नाही तर परदेशातूनही राजकीय नेते निवडणूक काळात दर्शनासाठी येतात. श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे यांनी याच महिन्यात तिरुपतीचे चौथ्यांदा दर्शन घेतले असे सांगितले जात आहे. बालाजीच्या दर्शनाला दररोज किमान ५० हजार भाविक येतात.

Leave a Comment