ट्विटरवर ट्रेंड करत आहे #DemonetisationYaadRakhna

twitter
नवी दिल्ली – रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा केल्यानंतर देशभरातील राजकीय घडामोडींना प्रचंड गती आलेली दिसते. तारखा घोषित केल्यानंतर याचा परिणाम रस्त्यावरच नाही तर समाज माध्यमांवरही पाहण्यास मिळत आहे. ट्विटरच्या जागतिक ट्रेन्डमध्ये सध्याच्या घडीला #DemonetisationYaadRakhna हा ‘हॅशटॅग’ ट्रेडिंगवर दिसला.

देशात लोकसभेसाठी ११ एप्रिल ते १९ मेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. राजकीय पक्षच नाही तर समाज माध्यमांवरही यादरम्यान राजकारण तापलेले दिसत आहे. ट्विटर हे सर्वात जलद गतीने अपडेट होणारे माध्यम झाले आहे. या माध्यमाचा राजकीय पक्ष चांगलाच उपयोग करत आहेत.

ट्विटरवर सध्या #DemonetisationYaadRakhna हा हॅशटॅग जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकार आहे. जगभरातून केवळ ५ तासात २८.८ हजार ट्विटस् या हॅशटॅग खाली करण्यात आल्यामुळे नोटाबंदीच्या आठवणी या निवडणूक काळात पुन्हा ताज्या झाल्या आहेत. काँग्रेसशासित सर्व राज्यातील अधिकृत अकाऊंट्सच्या माध्यमातून #DemonetisationYaadRakhna हा ट्विटर ट्रेन्ड करण्यात आल्याचे दिसत आहे. तर, या हॅशटॅगच्या माध्यमातून काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनीही ट्विट केले आहे. तर, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ३ तासांमध्ये १.१ हजार रिट्विट झाले आहेत.