प्रथमच महिला अंतराळात स्वतंत्रपणे करणार स्पेस वॉक

spacewalk
अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रथमच दोन महिला स्वतंत्रपणे स्पेसवॉक करणार असल्याचे जाहीर केले आहे. हा वॉक २९ मार्च रोजी केला जाईल आणि तो सात तासांचा असेल असे समजते. एन मॅक्लेन आणि क्रिस्टीना कोश या दोघी अंतराळात स्पेस वॉक करणार असून त्यांना मार्गदर्शन आणि सपोर्ट करण्यासाठी महिला टीम नियुक्त केली गेली आहे. कॅनडा स्पेस एजन्सीची फ्लाईट कंट्रोलर क्रिस्तन फॅरीओल त्यासाठी ह्युस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटर मध्ये हजर झाली आहे.

नासा प्रवक्ती स्टिफेनी शिअरहोल्ज या संदर्भात माहिती देताना म्हणाली, अंतराळात स्पेस वॉक मोहिमेत सर्व महिला ब्रिगेड असण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात लीड फ्लाईट डायरेक्टर मेरी लॉरेन्स, फ्लाईट कंट्रोलर जॅकी कॅगी या सामील आहेत. नासा मध्ये फ्लाईट डायरेक्टर महिलांचे प्रमाण ५० टक्के आहे.

स्पेस वॉक अनेक कारणांनी केला जातो. अंतराळ यानाची दुरुस्ती, वैज्ञानिक प्रयोग, नवीन उपकरण चाचण्या, अंतराळात बिघडलेले उपग्रह जमिनीवर आणण्यापेक्षा तेथेच दुरुस्त करणे अशी अनेक कामे स्पेस वॉक करून केली जातात.

Leave a Comment