जाणून घ्या काय आहे ‘व्हीव्हीपॅट’

VVPAT
नवी दिल्ली – मागील काही काळापासून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर विविध राजकीय पक्षांकडून सवाल उपस्थित केले जात असल्यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर-व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल) मशीनचा वापर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्याचबरोबर यावेळेस ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची छायाचित्रे देखील उपलब्ध असणार आहेत. जीपीएसद्वारे मशीनवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये निवडणूक आयोगाला मतदान यंत्रणेवरचा मतदारांचा विश्वास वाढावा यासाठी मतदानावेळी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर काही मतदान केंद्रांवर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर झाला होता.

व्हीव्हीपॅट म्हणजे नेमके काय – भारतात मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर केला जातो. पण ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर राजकीय पक्षांकडून नेहमी प्रश्नचिन्ह उभे केले जात असल्यामुळे मतदारांना आपल्या मतदानाबद्दल अधिक विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो. मतदाराने व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मत दिले आहे. ते मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही, याची शहानिशा करता येते.

एखाद्या उमेदवाराला मतदार ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान करतो. ईव्हीएमच्या शेजारी असलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधून त्यावेळी उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि पक्षाचे चिन्ह यांचा उल्लेख असलेली चिठ्ठी ७ सेकंद मतदाराला दिसते. ती चिठ्ठी त्यानंतर एका सीलबंद पेटीत जमा होते. एका काचेच्या पेटीत व्हीव्हीपॅट मशीन बंद असल्यामुळे ती चिठ्ठी मतदार बघू शकतो. व्हीव्हीपॅटला किंवा त्या चिठ्ठीला मतदाराला हात लावता येत नाही. फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना ती काचेची पेटी उघडण्याचा अधिकार असतो.

Leave a Comment