असे तपासून पहा तुमचे मतदार यादीतील नाव

election
मुंबई : कालच देशाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकींची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली त्यानुसार देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर निवडणुकांचे निकाल गुरुवार 23 मे 2019 रोजी जाहिर करण्यात येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता आपले नावाची मतदार यादीत नोंद आहे की नाही ते आताच तपासून पाहा. कारण मतदार यादीत नाव नसल्याने तुम्हाला तुमचा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आजच आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करुन घ्या.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती वेबसाईटवर मिळवू शकतो. आपले नाव पाहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- http://103.23.150.139/marathi/ त्याचबरोबर https://ceo.maharashtra.gov.in/ या साईटवरही आपले नाव पाहता येईल. तसेच electionmsd.blogspot.in या ब्लॉगवरही आपल्या नावाची नोंद आहे की नाही हे तपासून पाहू शकता.

आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश आहे की नाही हे तपासण्यासाठी वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाल. संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्यासमोर Name Wise आणि ID Card Wise हे दोन पर्याय उपलब्ध असतील. त्यातील Name Wise पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे District आणि Assembly असे दोन पर्याय समोर येतील. त्यापैकी Assembly हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील. त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो Select District. त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका. त्या पुढचा पर्याय Select Assembly असा असेल. म्हणजेच त्यात तुमचा मतदारसंघ असेल. या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा. त्यानंतर तुमचे नाव टाका. त्यानंतर तुमचे आडनाव टाका. त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका. हे सर्व रकाने भरल्यानंतर Search या पर्यायवर क्लिक करा.

दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल. याशिवाय तुम्हाला तुमचे मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहता येणार आहे.

Leave a Comment