बैठकी सुरु करण्याआधी राजकीय पक्ष राष्ट्रगीत का वाजवत नाहीत?

pawan-kumar
कुरनूल – चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्याआधी वाजवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीतासंदर्भात एक वक्तव्य करुन दाक्षिणात्य अभिनेता आणि जन सेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. पवन कुमार यांनी चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु होते तेव्हा उठून उभे रहावेसे मला वाटत नसल्याचे म्हटले आहे. २०१६ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामध्ये राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ चित्रपटगृहात सर्वांनी उभे राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले होते. पवन कल्याण यांनी त्यावेळीही न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शवली होती.

पवन यांनी राष्ट्रगीतासंदर्भात आपले मत आंध्रप्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान तरुणांशी संवाद साधताना मांडले. राष्ट्रगीत जेव्हा चित्रपटगृहात वाजवले जाते तेव्हा मला उभे रहायला आवडत नाही. त्याचबरोबर चित्रपटगृहात कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर निवांत चित्रपट पाहण्याच्या उद्देशाने गेल्यानंतर आधी आपण देशभक्त असल्याचे प्रत्येकाला दाखवावे लागते, हे चुकीचे असल्याचे मत पवन कल्याण यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर पवन कल्याण यांनी राष्ट्रगीतासंदर्भात राजकीय पक्षांना आणि नेत्यांना प्रेम नाही का अशा आशयाचा प्रश्न उपस्थित केला. देशातील सर्वच राजकीय पक्ष आपल्या बैठकीच्याआधी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत? केवळ चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन का?, देशातील सरकारी कार्यालयांमध्येही राष्ट्रगीत वाजवले जावे. जे लोक आपल्यासाठी नियम आणि कायदे तयार करतात त्यांनीच ते अमलात आणून सामान्यांसमोर एक आदर्श निर्माण करावा, असं पवन कल्याण यांनी म्हटले आहे.

Leave a Comment